bank of maharashtra
bank of maharashtra

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची ९०० घरांसाठी नवीन लॉटरी; पाहा कुठे आणि कशी असतील घरं?

0

मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लवकरच मुंबईतील जोगेश्वरी भागात सुमारे ९०० घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे म्हाडाला ही मोठी लॉटरी काढण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडणाऱ्या घरांचा समावेश असणार आहे.

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची ९०० घरांसाठी नवीन लॉटरी; पाहा कुठे आणि कशी असतील घरं?.

जोगेश्वरी पीएमजीपी वसाहतीचा कायापालट –

जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीचे बांधकाम १९९० च्या दशकात झाले होते. सध्या या ठिकाणी १७ इमारती असून त्यात ९४२ निवासी आणि ४२ व्यावसायिक गाळे आहेत. या संपूर्ण २७,६२५ चौरस मीटर जागेचा आता एकत्रित पुनर्विकास केला जाणार आहे.

म्हाडाला कसा फायदा होणार?

या प्रकल्पातील निम्म्या जागेवर सध्याच्या रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, तर उर्वरित अर्ध्या जागेवर विक्रीसाठी नवीन इमारती बांधल्या जातील. या विक्री घटकातून म्हाडाला सुमारे ८०० ते ९०० घरे उपलब्ध होणार आहेत, जी लॉटरी पद्धतीने सर्वसामान्यांना विकली जातील.

घरांचे स्वरूप आणि उत्पन्न गट

मिळालेल्या माहितीनुसार, या पुनर्विकास प्रकल्पामध्ये मध्यम आणि अल्प उत्पन्न गटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे

१. मध्यम उत्पन्न गट (MIG): सुमारे ५५० घरे उपलब्ध असतील.
२. अल्प उत्पन्न गट (LIG): सुमारे ३०० ते ३५० घरे उपलब्ध असतील.

पुनर्वसनानंतर रहिवाशांना ४५० चौरस फुटांची घरे मिळतील. तर विक्रीसाठी उपलब्ध असणारी घरे ४५० ते ६५० चौरस फूट या दोन प्रकारात असतील.

विमानतळ ‘फनेल झोन’चे बंधन –

हा प्रकल्प विमानतळाच्या जवळ असल्याने येथे फनेल झोन नियमांचे पालन करावे लागणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतींच्या उंचीवर मर्यादा असतील, त्यामुळे या इमारतींची उंची साधारणपणे ५५ ते ५६ मीटरपर्यंत मर्यादित ठेवली जाईल. या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ४५० कोटी रुपये इतका आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech