शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे-  मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई: शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे-  मंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याची सर्वांगिण प्रगती व्हावी तसेच कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, गरीबी, निरक्षरता दूर व्हावी याअनुषंगाने अर्थसंकल्पाची आखणी होणे गरजेचे असते. शासनाचा प्रत्येक पैसा हा सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या पुर्ततेसाठी खर्च व्हावा यासाठीचे सर्वात महत्वाचे आयुध म्हणजे अर्थसंकल्प होय, असे प्रतिपादन वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित संसदीय अभ्यासवर्गात ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया – कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्वपूर्ण साधन’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे. देशातील १०३ पैकी २७ युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. देशात आणि राज्यात अर्थसंकल्पातून याला चालना देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना हा जनतेचा पैसा आहे, हा दृष्टीकोन असायला पाहिजे. प्रत्येक पैशाचा वापर हा कल्याणकारी राज्याच्या दिशेने व्हायला पाहिजे. भविष्याचा द्रष्टीकोन, तत्कालीन प्रश्न आणि आर्थिक द्रष्टीकोनातून अर्थसंकल्पाची मांडणी व्हायला हवी. त्याचबरोबर मर्यादीत साधनसामुग्री आणि अमर्यादीत गरजा यांचा तोल राखून अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रश्नांचा वेध घेत त्याचबरोबर बदलत्या जगाचा वेध घेत अर्थसंकल्प सादर करावा लागतो. भुकमुक्त समाज, विषमतामुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दीष्ट असावे. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत विचारपूर्वक अर्थसंकल्प मांडावा. निवडणुकीचा वेध घेत अर्थसंकल्प मांडल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. ग्रेट ब्रिटन, श्रीलंका यांच्यासह युरोपातील अनेक देश याचे दुष्परिणाम भोगत आहेत. त्यामुळे कल्याणकारी राज्यनिर्मितीसाठी शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी दर्शना खंडीझोड हिने आभार मानले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech