महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा आणि पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

0

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा आणि पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 26 व्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि 21 वी महिलांसाठी राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले. बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात तर पश्चिम रेल्वे महिला विभागात अजिंक्य ठरले.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे दिनांक 24 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघाना कामगार कल्याण चषक आणि रोख 50 हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास चषक आणि रोख 35 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे.एस.डब्ल्यू. ने क्रांती अग्रणीचा 37-36 असा निसटता पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला 29-27 असे हरवले तर शहरी विभागात पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा 37-24 असा पराभव केला.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech