bank of maharashtrabank of maharashtra

लसीकरणाला गंभीरतेने घ्या जिल्हाधिकारी आर विमला यांचे आवाहन

0

 

नागपूर: कोरोनाचा नवीन विषाणू विध्वंसक नाही. कोरोना गेला. लसीकरण नाही केले तरी चालेल, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. नागपूर जिल्ह्यात एका महिन्यात कोरोना बाधितांची मृत्यु संख्या 135 झाली आहे. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी दुसरा डोस पूर्ण करावा, असे आग्रही आवाहन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचा वेग आणखी वाढणे आवश्यक आहे. नागरिकांना दूरध्वनी करून यंत्रणेमार्फत डोस घेण्याबाबत सातत्याने सांगितले जात आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी कोरोना आजाराला अजूनही फारसे गंभीर घेतले जात नाही. ही बाब अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले अथवा नाही याची काळजी फक्त आरोग्य यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे. कोरोनावर एकच उपाय तो म्हणजे लसीकरणाचा आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, प्रशासनासोबत आपल्या आजुबाजुच्या प्रत्येक नागरिकाला लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन केले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागातील लसीकरणाची माहिती दिली. नागरिकांना कॉल सेन्टरवरुन दूरध्वनी करुन लसीकरणासाठी बोलवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षा मेश्राम उपस्थित होत्या.

2 जानेवारीपासून 135 मृत्युमुखी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या निरंक होती. 2 जानेवारीपासून मृत्युमुखी पडण्याच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. २ जानेवारी पर्यंत दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या 10 हजार 123 होती. आज 1 फेबुवारीला ही संख्या 10 हजार 258 आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात ही संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात नागपूर महानगर क्षेत्रातील शंभरावर लोकांचा समावेश आहे. ही संख्या दुर्लक्षित करता येणार नाही.

लसीकरणाशिवाय उपाय नाही

भारतात आतापर्यंत आलेल्या साथीमध्ये लसीकरण हेच प्रभावी ठरले आहे. प्लेगची साथ लसीकरणानंतरच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे लसीकरण न केलेल्या नागरिकांना अनेक रोगांची लागण होत आहे. कोरोना विषाणू लसीकरण न झालेल्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे विश्लेषण केले असता ज्यांचे लसीकरण झाले नाही अशांनाच कोरोनाने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे.

5 लाख लोकांना धोका

नागपूर जिल्ह्यात आज पर्यंत 98.58 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 68.31 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. म्हणजेच जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. ही पाच लाख लोकसंख्या कोरोनासाठी पूरक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी या सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. जोपर्यंत शंभर टक्के लसीकरण होणार नाही. तोपर्यंत अनेक निर्बंध जिल्ह्यात कायम राहणार आहे. प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. नागरिकांनी देखील आरोग्य यंत्रणेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी या पत्रकार परिषदेत केले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech