bank of maharashtrabank of maharashtra

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा

0

मुबई: कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार. कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

मंत्री श्री. सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषी विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, डॉ. विकास पाटील, उदय देवळाणकर यांच्यासह योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणारे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे पाठपुरावा करून दरमहा अहवाल सादर करावा. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. कृषी योजनांच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री, अवजारे, उपलब्ध साधनसामग्रीची माहिती कृषी विभागाने बांधावर उपलब्ध करून द्यावी. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती उपलब्ध करून द्यावी. पिकांवर वेगवेगळे रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, अशा परिस्थितीत पिकांवरील कीड रोगांच्या प्रतिबंधासाठी सुरूवातीलाच उपाययोजना कराव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचनाही त्यांनी केली.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभाग राबवित असते. आजच्या बैठकीत मंत्री श्री. सत्तार यांनी, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अन्न सुरक्षा अभियान, पीक स्पर्धा, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हावा, यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करावे आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि गतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी योजनांची अंमलबजावणी, त्याची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन याची सविस्तर माहिती दिली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech