ग्राहकांनी रूफटॉप सोलर बसवून वीजबिलात बचत करावी

0

मुंबई: ग्राहकांनी रूफटॉप सोलर बसवून वीजबिलात बचत करावी. ‘भारत सरकारच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये रुफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत ग्राहकांनी रूफटॉप सोलर आपल्या छतावर बसविल्यास ग्राहकांच्या वीजबिलात बचत होईल आणि या माध्यमातून ग्राहकांना उत्पन्न देखील मिळेल. याकरिता ग्राहकांनी जास्तीजास्त प्रमाणात रुफटॉप सोलर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल यांनी केले आहे.

महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे रुफटॉप सोलर वितरण एजन्सीच्या प्रतिनिधींची महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल यांनी ऑनलाईनद्वारे बैठक घेतली. या बैठकीस प्रकल्प विभागाचे संचालक श्री.प्रसाद रेशमे, प्रभारी मुख्य अभियंता श्री.चंद्रमणी मिश्रा यांच्यासह घरगुती रूफटॉप सोलर योजना राबविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीस सुमारे १६० एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. सिंघल म्हणाले की, केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेत घरगुती ग्राहक आणि गृहनिर्माण संस्थाना रूफ टॉप बसविण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांना १ ते ३ कि.वॅ. क्षमतेपर्यंत प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात ४० टक्के तसेच ३ कि.वॅ. चे वर ते १० कि. वॅ. पर्यंत खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनूदान देण्यात येत आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना करिता १ कि.वॅ. ते ५०० कि. वॅट करिता प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम ग्राहकांनी निवडलेल्या संबंधित एजन्सीला द्यायची आहे.

पुढे श्री.सिंघल म्हणाले, ‘रूफटॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. एजन्सीने जास्तीजास्त ग्राहकांकडे रूफटॉप सोलर बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. अनुदान प्रक्रियेत कागदपत्रांच्या त्रुटींसंदर्भात कर्मचारी व एजन्सी प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करून अनुदान प्रक्रिया अधिक गतिमान करावी. याकरिता एजन्सीना क्षेत्रीय स्तरावरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी असे निर्देश श्री.सिंघल यांनी दिले.

यावेळी एजन्सी प्रतिनिधींना क्षेत्रीयस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन संचालक(प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे यांनी केले. यावेळी रूफटॉप संबंधित सर्व परिपत्रके वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याचबरोबर एजन्सीच्या प्रतिनिधींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत करण्यात आलेल्या मार्गदर्शनाबाबत एजन्सी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech