२३ एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत होणार !

0

गुंदवली ते भांडुप संकूल जल बोगद्याची दुरुस्ती पूर्ण

मुबई : मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती. हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर जणू आव्हानच होते.

जलबोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जल अभियंता खात्याने, पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करुन त्यातील पाणी उपसण्यात आले. जलवाहिन्या व जल बोगद्यावरील झडपांचे नियंत्रण तातडीने केले. एकूण झडपांपैकी सर्वात मोठ्या ३ हजार ७५० मिलीमीटर व्यासाच्या झडपेचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. प्रत्यक्ष दुरुस्ती काम दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सुरु झाले. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टींची सुसज्जता राखली गेली. यानंतर, भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे (शाफ्ट) पोलादी घूमट (डोम) कापून क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. क्रेन व पोलादी पाळण्याच्या सहाय्याने संपूर्ण जल बोगद्याचे निरीक्षण करण्यात आले. भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आतमध्ये पॅकर टाकून विशिष्ट अशा ग्राऊटिंगने पाणी गळती बंद करण्‍यात आली. आतील दुरुस्ती पॅकर व पोलादी प्लेटच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कुपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले. बोगद्यातील संपूर्ण उभी केलेली यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्यात आली. यानंतर कापुरबावडी व भांडूप संकुल येथील पोलादी घुमट (डोम) वेल्डींगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले. हे सर्व काम नियोजन केलेल्या ३० दिवसांच्या तुलनेत १२ दिवस आधीच पूर्ण करण्‍यात आले आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech