महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३

0

 

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदरात सवलत लागू करण्यात आली असून ही सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन आणि २७ अश्वशक्तीखालील घटकांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आलेली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देण्यात आलेली होती, त्यानंतर यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही मुदत ३१ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. मात्र, या मुदतीत देखील बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही

सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन तसेच २५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयान्वये २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक २ सप्टेंबर २०२१ च्या शासन पत्रानुसार एक महिन्याची म्हणजे २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जोपर्यंत ते सदर नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत, त्यामुळे सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी विहित मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन (२७ अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech