जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत आता अत्याधुनिक क्राऊलर कॅमेरा शोधणार !

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाकडून मुंबईतील विविध विभागांमध्ये जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध पाणी हे पुरवले जाते. मुंबईतील पाणी वितरणाच्या जाळ्यातील पाण्याची गळती आणि दूषित पाण्याच्या पुरवठ्याच्या तक्रारीदेखील जल अभियंता विभागाकडून दुरूस्त केल्या जातात.

अनेकदा जलवाहिन्यांमध्ये निर्माण झालेली पाण्याची गळती किंवा दूषित पाण्याचा शिरकाव शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. हे काम वेळच्या वेळी व तातडीने व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील ‘तातडीचे दुरूस्ती’ खाते मुंबईकरांच्या सेवेसाठी अव्याहतपणे कार्यतत्पर असते. हा विभाग आठवड्याचे सातही दिवस तसेच २४ तास २४ प्रभागाकरीता अखंडीतपणे कार्यरत असतो. जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येत आहे.

जलवाहिनीतील अंतर्गत निरीक्षणासाठी देखील या विशेष उपकरणाचा वापर करण्यात येत आहे. क्राऊलर कॅमेऱ्याच्या वापरामुळे नागरिकांचा पाणी पुरवठा किमान वेळेत सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच दुरूस्तीच्या कामात जलअभियंता विभागाचा महत्वाचा वेळ वाचण्यासाठीही मदत होणार आहे.

मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्या निर्देशानुसार अव्याहतपणे पाणी पुरवठ्याच्या सेवेचे काम सुरू असते. नागरी सेवांमध्ये पाण्यासारखी सुविधा अखंडीतपणे देण्यासाठीच्या अनुषंगाने उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री चक्रधर कांडलकर आणि जलअभियंता श्री. पुरूषोत्तम माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा नागरिकांना पुरविल्या जातात. याच उपाययोजनांचा भाग म्हणून दुरूस्तीच्या कामातील वेळेची बचत होण्याच्या अनुषंगाने क्राऊलर कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानाच्या वापराचा पुढाकार घेण्यात आला आहे.

कॅमेऱ्याची कार्यपद्धती :

अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मुंबईतील जलवाहिन्यांचे जाळे हे भूमीगत असतानाच विविध परिमंडळातून जाते. अतिशय क्लिष्ट अशा जलवाहिनीच्या वितरण जाळ्यामुळे पाण्याची गळती अथवा दूषित पाणीपुरवठ्याचे ठिकाण शोधणे हे आव्हान ठरत असते. त्यामुळे सीसीटीव्ही सारखी पद्धती असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा क्राऊलर कॅमेरा वापरात येईल. क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडिओ मिळवणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य होते. कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे. कॅमेऱ्याला चार चाकांमुळे २०० मीटरपर्यंतचे अंतर पार करणे शक्य आहे. या कॅमेऱ्याचे संचलन दूरसंवेदक (रिमोट)ने करणे शक्य आहे. त्यासोबतच जलवाहिनीच्या आतील बाजुची दृश्ये टिपणे, रेकॉर्ड करण्यासाठी प्रखर दिव्यांची प्रकाशयोजनाही कॅमेऱ्याला करण्यात आली आहे.

कॅमेर्‍याची उपयुक्तताः

जलवाहिन्यांमध्ये जेव्हा गळती शोधण्यासाठी माणूस उतरून काम करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर खुपच सोईचा आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा डेटा रेकॉर्ड करायलाही मदत करतो. कॅमेऱ्याच्या वापरामुळे जलवाहिनीचा आकार, जलवाहिनीतील रूंदी किंवा निरीक्षण केलेले अंतर अशी सर्व आकडेवारी उपलब्ध व्हायला मदत होते. परिणामी गळतीचे नेमके ठिकाण किंवा दूषित स्रोत शोधणे शक्य होते.

जलवाहिनीच्या आतील बाजुला कॅमेरा २०० मीटरच्या अंतरासाठी वापरला जाणे शक्य आहे. तसेच २५० मिमी ते १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांसाठी या कॅमेऱ्याचा वापर करणे शक्य आहे. जल अभियंता विभागाकडून नियोजित आणि तातडीच्या स्वरूपात कामे हाती घेण्यात येतात. अनेक कामांचे स्वरूप हे आपत्कालीन स्वरूपाचे तसेच पाणी वितरणाच्या यंत्रणेच्या सक्षमीकरण किंवा दुरूस्तीच्या रूपातील असते. त्यामुळेच क्राऊलर कॅमेऱ्याचा दोन वर्षासाठीचा वापर करण्यासाठीची निविदा प्रक्रिया जलअभियंता विभागाकडून सुरू झाली आहे.

अनेकदा एखादी जलवाहिनी जुनी किंवा जास्त गंजलेली असतानाही या कॅमेऱ्यामुळे त्या जलवाहिनीचे काम हाती घेणे आवश्यक असल्याचा इशारा मिळतो. तसेच एरव्ही खोदकाम करून नेमकी पाण्याची गळती न सापडण्याचा धोकाही या कॅमेऱ्याच्या वापरामुळे टळतो. त्यामुळेच जलवाहिनीतील पाणी काढून टाकून त्याठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी होतो. परिणामी दुरूस्तीचे नेमके ठिकाण शोधून काढणे आणि त्याठिकाणी दुरूस्ती करणे शक्य होते.

जलअभियंता विभागाकडे याआधीही अशा स्वरूपाचा स्वतःच्या मालकीचा कॅमेरा होता. त्याची हाताळणी करण्याचे प्रशिक्षण हे विभागातील कर्मचाऱ्यांकडे आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात हा कॅमेरा वापर आणि देखभाल दुरूस्तीनंतर आता वापरण्याजोगा राहिलेला नाही. परिणामी २ वर्षांच्या कालावधीसाठी कॅमेरा करारान्वये वापरासाठी घेण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. या कराराच्या कालावधीत कॅमेऱ्याच्या देखभालीची जबाबदारी सेवा पुरवठादार कंपनीची असणार आहे. तर पालिकेच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून या कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञान असणाऱ्या कॅमेरा विकत घेण्यासाठी सदर विभाग विचाराधीन आहे. देशात अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या खूपच कमी संस्था आहेत, त्यापैकी एक बृहन्मुंबई महानगरपालिका ठरली आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech