कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता

0

 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

शासनातर्फे विविध आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण ३८.९३ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पूर परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण २६४ पदांसाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech