bank of maharashtrabank of maharashtra

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज

0

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज. विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या  काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे. अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असा आशावाद राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

 या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतकृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदातेविद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इतर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार शेखर निकमआमदार योगेश कदमजिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्गजि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखडतसेच या प्रदर्शनाचे प्रायोजक पितांबरी समुहाचे रविंद्र प्रभूदेसाई आदी समावेश होता.    

रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्ह्याची हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगभरात ओळख आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे तर विद्यापीठात शेती विषयक विज्ञान व संशोधन आहे. याची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणाऱ्या  प्रदर्शनात व्हायला हवा असेही राज्यपाल महोदयांनी सांगितले.

 जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकेची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

 डॉ. बाळासाहेब सावंतांसारखी व्यक्ती रत्नागिरी तालुक्यात जन्मली हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवास मी शुभेच्छा देतो असेही सामंत म्हणाले.

यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी स्वागतपर भाषणात कुलगुरु डॉ. सावंत यांनी विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती दिली. त्यासोबत या प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका मांडली.

कार्यक्रमाची सुरुवात व शेवट राष्ट्रगीताने झाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन

राज्यपाल महोदयांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनात पाहणी करुन शेतकरी व इतर सहभागी स्टॉल्सला भेट देवून माहिती घेतली.

विद्यापीठात जंगल भ्रमंतीसाठी इलेक्ट्रीक वाहन घेण्यात आले आहे. यात बसून राज्यपाल महोदयांनी याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech