अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव होणार ‘साहित्यरत्न भूमी’! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे निर्देश

0

 

मुंबई,: अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता.शेवगाव) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अस्थींचे बोधेगाव (ता. शेवगाव) येथे विसर्जन करण्यात आले असल्याने त्या ठिकाणी ‘साहित्यरत्न भूमी’ नावाने भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांचेसह सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (दूरदृश्यप्रणालीद्वारे), समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगरचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेचे डॉ. दीपक चांदणे आदी उपस्थित होते.

बोधेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारताना त्यात अद्ययावत ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका त्याबरोबरच शिल्पसृष्टी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा, त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे संग्रहालय या घटकांचा या स्मारकाच्या प्रस्तावात समावेश केल्यास नव्या पिढीला अण्णा भाऊ साठे यांचे जीवनकार्य प्रेरणादायी ठरेल, असे राज्यमंत्री डॉ. कदम यांनी सांगितले.

5 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार अशा प्रकारचे स्मारक उभारण्यासह त्याचा विकास करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करण्याचे निकष, नियमावली निश्चित करण्यात आली आहे, त्यानुसार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ या नावाने भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी दिले. या स्मारकासाठी आवश्यक जागा, बोधेगावचे महत्त्व आणि अनुषंगिक बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी तपासून त्याचा प्रस्तावात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech