येत्या तीन वर्षात ‘म्हाडा’ तर्फे पाच लाख घरांची निर्मिती

0

मुंबई: येत्या तीन वर्षात म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी 50 हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व राज्यशासनाच्या जमिनीबाबत आढावा तसेच ठाणे येथील शासकीय जमिनीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री श्री.आव्हाड बोलत होते.

मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, शासनाकडे सध्या दहा हजार गृहसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी दहा टक्के घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व दहा टक्के घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या दोन महिन्यामध्ये लॉटरी निघून एकूण 10 हजार घरांपैकी एक हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना तर एक हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच गरीबांसाठी परवडणारी घरे ही सरकारसाठी वेगळी आणि विकासकासाठी वेगळी अशी न बांधता एकत्रितच घरे बांधण्‍यात येतील व त्यांची एकत्रित लॉटरी काढण्यात येईल.

ठाण्यातील वर्तक नगर भागात ‘म्हाडा’च्या दर्शनी भागातील इमारतींचाच पुनर्विकास झाला. समान न्याय या तत्वानुसार म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना संपुर्ण लेआऊटचा एकत्रित पुनर्विकासच करण्यात येईल. याच तत्वानुसार कन्नमवार नगर, टागोर नगरांचा विकास करण्यात येईल. ठाण्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेखाली प्रायोगिक तत्वामध्ये 10 एकरवरील जागेमध्ये जे बांधकाम करतील त्यांना वीस टक्के जागा व्यावसायिक उपयोगासाठी देण्यात येईल. या प्रकल्पासाठी अंतीम मान्यता गृहनिर्माण विभागकडूनच देण्यात येईल. कळवा येथे 72 एकर, उत्तर शिव व मोघरपाडा येथे सुमारे 100 एकर जागेवर नवीन गृहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री.आव्हाड यांनी दिली.

यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, म्हाडा कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ.माधव कुसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech