मुंबई :वर्धा व नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी. वर्धा व नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी व आवश्यकता असेल तिथे तात्काळ नवीन योजना प्रस्तावित करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. वर्धा व नागपूर जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव अभय महाजन, सतीश चंद्र सुशिर, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपुर, संतोष गवाणकर, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चंद्रपूर, अधीक्षक अभियंता प्रकाश नंदनवारे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वर्धा वाढीव पाणीपुरवठा योजना
अमृत कार्यक्रमांतर्गत वर्धा वाढीव पाणीपुरवठा योजना कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावी. योजनेच्या बचतीमधून कामे करण्यास मंजुरी द्यावी तसेच त्याविषयी नगरविकास विभागास कळविण्यात यावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिले.
सेवाग्राम व 5 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
सेवाग्राम व 5 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही सुमारे 32 कोटी रुपयांची असून मुख्य अभियंता यांनी तांत्रिक व्यवहार्यता समितीकडे सादर केली आहे. या समितीची तातडीने बैठक घेऊन पुढील मान्यतेची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्र्यांनी यावेळी दिले.
पिंपरी मेघे व 12 गावे पाणीपुरवठा योजना
पिंपरी मेघे व 12 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावाही मंत्री श्री.पाटील यांनी घेतला. या योजनेचे काम तातडीने पूर्ण करा तसेच संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत चणकापूर पाणीपुरवठा योजना
जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात चणकापूर पाणीपुरवठा योजनेच्या बचती मधून जलशुध्दीकरण केंद्रासाठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी. योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.
गुंजखेडा व नाचणगाव (देवळी)
गुंजखेडा व नाचणगाव (देवळी) या पाणीपुरवठा योजनांचा आढावा श्री. पाटील यांनी घेतला.या दोन्ही योजनांचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.