वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्टस् मेडिसिन’ चा समावेश होणे आवश्यक

0

मुंबई : विविध प्रकारच्या मैदानी खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्टस् मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज वरळी येथील पोद्दार वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी श्री. देशमुख यांनी पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय, पोद्दार रुग्णालय आणि पोद्दार वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता दिपनारायण शुक्ला,संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशमुख म्हणाले, ‘स्पोर्टस् मेडिसिन’ हे वैद्यकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असून असे अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी वैद्यकीय संस्थांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मेडिकल स्पोर्ट तसेच शारीरिक शिक्षण यांसारख्या संकल्पनांना प्रोत्साहित करून अशा अभ्यासक्रमांचा समावेश येणाऱ्या काळात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात प्रामुख्याने होणे अपेक्षित आहे. योग, पंचकर्म असे संस्कार भारतीय संस्कृतीची अमूल्य संपदा आहे. या संस्कारांचा दैनंदिन जीवनात समावेश होणे आवश्यक आहे. या संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत प्रोत्साहित करण्यात येईल. विद्यार्थ्यांशी संवाद, योगशास्त्र, औषधी वनस्पती, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी यांच्यामार्फत लोकांशी जवळीक साधली पाहिजे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीदरम्यान श्री. देशमुख यांनी महाविद्यालयातील व वस्तीगृहातील विविध पायाभूत सुविधांविषयी सविस्तर चर्चा केली. याअंतर्गत वैद्यकीय अभ्याक्रमात रुजू होण्याची प्रवेश प्रक्रिया, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगार संधी, संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम, आयुर्वेदिक औषधांना दिलेली नियमन व किंमत, आयुर्वेदिक उत्पादने व उत्पादकांची सविस्तर माहिती घेतली. पोद्दार रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहामधील वर्ग, शौचालय, विद्यार्थी संख्या, विद्युतीकरण, रस्ते, पार्किंग, पोद्दार रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा, रुग्ण खाटा याबाबत आढावा घेतला.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech