उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा
मुंबई :“सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान, असत्य, अंधश्रद्धेचा अंधकार यानिमित्ताने दूर होवो. मनातील, विचारातील कटुता संपून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. कोरोना लस आगमनाच्या शुभवार्तेनं साजरी होत असलेली यंदाची मकर संक्रात राज्यासाठी कोरोनामुक्तीची पहाट ठरो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मकर संक्रांतीच्या दिवशीच पोंगल, बिहू आणि उत्तरायण पर्व हे सणही आज साजरे केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीनं साजरा होत असलेल्या या सणांच्याही सर्वांना शुभेच्छा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच साजरे होत असलेले हे सण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरे करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
००००
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
नामविस्तार दिनाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 14 : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला. प्रगत, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेनं सुरु असलेली वाटचाल अधिक गतीमान केली. विद्यापीठ नामविस्ताराच्या निर्णयप्रक्रियेत योगदान दिलेल्या मान्यवरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, प्रगत, पुरोगामी विचारांच्या समृद्ध, संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.