पूरग्रस्तांना आवश्यक सर्व मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

 

सांगली: पूरग्रस्तांना आवश्यक सर्व मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती ती जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भिलवडी (ता. पलूस) येथे आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनदादा कदम, आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार अरूण लाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे भिलवडी येथे म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर झाले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे-दारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली तयारी हवी.

नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली जी निवेदने आहेत ती द्या त्यातील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिली.

भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अंकलखोप येथील पूरग्रस्तांशी अत्मियतेने संवाद साधत, ‘शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे’ असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली.

याप्रसंगी प्रांतअधिकारी मारुती बोरकर, तहसिलदार निवास ठाणे (पलूस) व कडेगाव तहसिलदार डॉ.शैलजा पाटील, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, महेंद्र लाड, नितीन बानगुडे – पाटील, भिलवडीच्या सरपंच सविता पाटील यांच्यासह भिवलडी व अंकलखोपचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech