नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

0

 

मुंबई : ‘नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. माझी वसुंधरा अभियान’च्या अंमलबजावणीतील अनुभव आणि अभियानाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. ‘वातावरणीय बदल’ घडवून आणण्यासाठी हे अभियान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असून त्यासाठी नवनवीन संकल्पनांचा अवलंब करण्याची सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.

‘माझी वसुंधरा अभियान’च्या कार्यालयात मंगळवारी आयोजित या बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ‘सिआ’ प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय नाहटा, अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रत्येक कार्यात अडथळे असतात परंतु त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावरील उपाययोजनांकडे लक्ष देऊन काम करावे. माझी वसुंधरा अभियान ही एक लहान सुरूवात आहे, आता पुढील टप्यात वातावरणात चांगले बदल घडविण्यात हातभार लावण्याची सर्वांना सवय व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकरिता जनजागृती होणे आणि विशेषत: तरूणाईला यामध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. याचा एक भाग म्हणून तरूण पिढीने आपल्या वाढदिवशी आपल्या वयाएवढी झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी केले.

माझी वसुंधरा अभियानाचा पुढील टप्पा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती, संस्थांची मदत घेण्याची सूचनाही श्री.ठाकरे यांनी यावेळी केली. समाजमाध्यमांबरोबरच विविध सेवाभावी संस्था तसेच चळवळींच्या माध्यमातूनही याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. माझी वसुंधरा हे अभियान एकूणच वातावरणात चांगला बदल घडवून आणण्यासाठी राबविण्यात येत असल्याने यात आणखी कोणकोणत्या बाबींचा समावेश करता येईल, याचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली. श्री.ठाकरे यांनी माझी वसुंधरा अभियानासाठी कार्य करणाऱ्या आंतरवासितांसोबतही संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी माझी वसुंधरा अभियानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि यापुढील अंमलबजावणीचा आराखडा मांडला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech