सौर ऊर्जाद्वारे 2-3 वर्षात शेतकऱ्यांना वीज

0

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना लागणारी वीज येत्या दोन-तीन वर्षात सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. यासाठी राज्यात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पावर शासनाने अधिक भर दिला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

महावितरण आणि ईईएसएलच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा गडहिंग्लज येथे आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगराध्यक्ष स्वाती कोरी, गोकुळचे संचालक बाबा देसाई, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अनिल भोसले, ईईएसएलचे अतिरिक्त महासंचालक अनिल दाभाडे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उपयुक्त असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कमी खर्चात वीज निर्मिती होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचेही महत्वपूर्ण काम होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 22 हजार मेगावॅट वीज लागणार असून ही वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे येत्या दोन-तीन वर्षात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. येत्या डिसेंबर अखेर 200 मेगावॅट वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

                        सौर उर्जेमुळे शेती – उद्योगाचे अर्थकारण बदलणार- पालकमंत्री

औद्योगिक घटकांनाही कमी दरात वीज उपलबध करुन देण्याच्या दृष्टीने गोकुळ शिरगाव येथे मोठा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, जलविद्युत निर्मितीला मर्यादा असून, त्याचा खर्चही मोठा आहे त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाच्या निर्मिती मध्ये उद्योजकांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. सौरऊर्जा निर्मितीचे छोटे- छोटे प्रकल्प हाती घेणे गरजेचे असून सौरउर्जा प्रकल्पाच्या निर्मितीमुळे देशातील शेती आणि उद्योगाचे अर्थकारणही बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलबध करुन देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या मोकळ्या जागेत, धरणाच्या कॅनॉलवर व अन्य मोकळ्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यास प्राधान्य दिले आहे. ऊन वाऱ्यापासून वीज निर्मिती बरोबरच ट्रॅक्टर, ड्रीपवरही सौरऊर्जा प्रकल्प जोडून शेतकऱ्यांना हवी असणारी वीज शेतातच कमी दरात उपलब्ध करुन देण्याचेही प्रयोग हाती घेणे गरजेचे आहे.

ईईएसएलच्या सहकार्यातून राज्यातील सर्व शासकीय इमारतीवर टप्याटप्यानी सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा मानस व्यक्त करुन,पालकमंत्री पुढे म्हणाले, या कंपनीच्या सहकार्यातून 1700 शासकीय इमारतीमध्ये एलएडी बल्ब, पंखे सौरऊर्जेद्वारे चालविले जात असून, यामुळे 112 कोटी रुपयांची बचत होत आहे. याबरोबरच ई-कारचा प्रस्तावही विचाराधीन आहे. सध्या शासनाने पाच ई-कार खरेदी केल्या आहेत. मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत ई-कारसाठी चार्जिंग सेंटर उभारण्याबाबतही विचार सुरु आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित कृषी वीज जोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, तसेच जिल्ह्यातील जुने धोकादायक विद्युत खांब बदलण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतीतून येत्या डिसेंबर मध्ये होणाऱ्या पुनर्विलोकनातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ठिबक व्यवस्था करुण्याबरोबरच धरणातील पाणी पाईप लाईन पुरविणे या गोष्टीस प्राधान्य दिल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात सौरऊर्जेचे प्रकल्प हाती घेत असून, कोल्हापुरात गडहिंग्लज, हलकर्णी, शिनोनी या तीन केंद्रामधून 2.42 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती करुन त्याद्वारे परिसरातील 5 हजार शेतकऱ्यांना दिवसा ही वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सुमारे 2 हजार टन इतक्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट करणे शक्य आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत विद्युत वितरण कंपनीच्या रिकाम्या जागेत सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीमुळे कमी दरात तसेच दिवसाच्या वेळी उच्च गुणवत्तेची आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध होणार असल्याने उर्जेच्या बाबतीत शेतकरी स्वयंपूर्ण होतील, असा विश्वासही पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech