राज्यपालांकडून एनसीसीला 50 हजार रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य ही देशसेवाच

0

मुंबई  : महाराष्‍ट्रातील विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून  देश निर्माण कार्यात अमुल्य योगदान देत आहेत. शिक्षण पूर्ण करीत असतांना हे कार्य करणे ही एक प्रकारची देशसेवा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

नवी दिल्ली येथे झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या 116 कॅडेट्स व 10 अधिकाऱ्यांच्या विजयी चमूच्या सन्मानार्थ राज्यपालांनी राजभवन येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

            राज्यपाल पुढे म्हणाले, एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबीर आणि अखिल भारतीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एनसीसीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी 17 राज्यांमधून महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला असून यामुळे राज्याची मान उंचावली आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर संतुष्ट न होता पुढील काळात प्रथम क्रमांक मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन राष्ट्रीय छात्र सेना ही सर्व कलागुणांनी संपन्न असली पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. केवळ स्वत:च शिस्तबद्ध न राहता इतरांनाही शिस्तबद्ध राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, तसेच देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी होऊ नये याबाबतही राष्ट्रीय छात्र सेनेने जनजागृती करावी, अशी अपेक्षा श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.

            यावेळी राज्य एनसीसीचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक ब्रिगेडियर राजेंद्र सिंह धैला, विंग कमांडर विक्रम त्यागरामन, कमांडर सुनिल बालकृष्ण, बिग्रेडियर जी. एस. चीमा, ग्रुप कॅप्टन एन. एस. देखणे आदी तिन्ही दलाचे वरीष्ठ अधिकारी सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर गीत गायनाने करण्यात आली. त्यानंतर छात्र सेनेमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

            चमकदार कामगिरीसाठी राज्यपालांचे एनसीसीला 50 हजार रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली येथे नुकतेच संपन्न झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत पुरस्कारांची लयलुट करणाऱ्या राज्यातील एनसीसीच्या चमूला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

राज्य एनसीसीला यंदा पंतप्रधान निशाण स्पर्धेत द्वितीय सर्वोत्तम संचालनालयाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्यपाल यांनी कौतुक केले.

महाराष्ट्र एनसीसीची उपलब्धी :

अखिल भारतीय स्पर्धा-अखिल भारतीय वायु सैनिक शिबीर 2019 मधील प्रथम क्रमांक, नकाशा वाचन स्पर्धेत लाईन क्षेत्र स्पर्धेत प्रथम क्रमांक, नेमबाजी स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तसेच अखिल भारतीय थलसैनिक शिबीर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

प्रजासत्ताक दिन शिबीर 2020 उत्कृष्ट संचालनालय एअरविंग स्पर्धेत राजवर्धन देसाई यांना सुवर्ण पदक, द्वितीय उत्कृष्ट कॅडेट्स सिध्दार्थ रघुवंशी, सर्वोत्कृष्ट मास्टर ऑफ सेरेमनी हेमाक्षी रेखा गोस्वामी, हेरांब प्रसाद भिडे, मनिष दिनेश सिंह, सर्वोत्कृष्ट घोडेस्वार अमित विनोद वासनिक, आणि गार्ड ऑफ ऑनर बेस्ट स्टिक ऑर्डली रिंकी राकेश सिंह यांनी पदक पटकावले आहे.

                                                                                              ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech