रायगड, पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी घेतले शोभिवंत मत्स्यपालनाचे प्रशिक्षण

0

मुंबई : महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानने दिनांक २० ते २२ जानेवारी २०२० दरम्यान शोभिवंत मत्स्यपालनाकरिता तीन दिवसांची कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. त्यामध्ये पालघर आणि रायगड जिल्ह्यातील ३७ ग्रामस्थांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.

कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. या अंतर्गत महाराष्ट्राच्या किनारी भागातील गावांमध्ये विविध शाश्वत उपजीविका प्रकल्प राबविले जातात. त्यापैकी शोभिवंत मत्स्यपालन हा एक व्यवसाय आहे. ही कार्यशाळा ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्रातील शोभिवंत मत्स्य उबवणी केंद्रात घेण्यात आली.

राष्ट्रीय मत्स्य अनुवंशिक संसोधन ब्युरो यांनी या उबवणी केंद्रासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. सध्या या केंद्रात क्लाऊन फिशच्या १० प्रजातींचे संगोपन केले जाते. प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना अन्नमलाई विद्यापीठातील तसेच उतेकर फिशरीजमधील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

क्लाऊन फिशच्या प्रजातींची ओळख, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, पाणी शुद्धीकरणाची यंत्र प्रणाली, खाद्य, या माशांना होणारे रोग, उपचार, त्यांची विक्री करण्याकरिता क्लाऊन फिशची बांधणी, वाहतूक आणि वितरण यासह बाजारपेठेची माहिती ही प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली. शोभिवंत माशांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्याला बाजारात चांगली मागणी आहे. एक उपजीविकेचे साधन म्हणून विकास करून किनारी जिल्ह्यांमध्ये रोजगार संधीची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात असल्याचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन कक्ष) विरेंद्र तिवारी यांनी यावेळी सांगितले.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech