प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर राज्यात मार्चअखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार

0

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. मार्च अखेर एकूण सुमारे ६५०० आरोग्यवर्धिनी केंद्र राज्यात कार्यान्वित होतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार हे राज्यातील चार आकांक्षित जिल्हे तसेच
भंडारा,चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली,
गोंदिया,अमरावती, सिंधुदूर्ग, जळगांव असे १९ जिल्ह्यातील एकूण ११६९ आरोग्य उपकेंद्रांचे व सर्व जिल्ह्यातील १५०१ (ग्रामीण भागातील) व ४१३ (शहरी भागातील) प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकूण 3083 आरोग्यकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये जालना, बीड, परभणी या सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यात ही केंद्रे सुरू होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रयत्न – आरोग्यमंत्री
सदर केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये व त्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.निवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१९-२० मध्ये पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३६९६ (आयुर्वेदीक २३८८, युनानी २३३ व बी.एस्सी नर्सिंग १०७५) समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण ऑगस्ट २०१९ पासून सुरु करण्यात आले आहे. प्रशिक्षित समुदाय आरोग्य अधिकारी हे निकास परीक्षा उत्तीर्ण होऊन फेब्रुवारी २०२० पासून आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत होतील. त्यामुळे मार्च पासून अजून ३५०० आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आधुनिक जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य रोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या दिल्या जाणाऱ्या माता बालसंगोपन आरोग्य सेवांमध्ये वाढ करुन असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी आरोग्य सेवा आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून पुरविण्याचे उद्दीष्ट आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये १३ प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत :-
१. प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा
२. नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा
३. बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
४. कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्य सेवा
५. संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांची बाह्य रुग्ण सेवा
६. संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
७. असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
८. मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
९. नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधी सेवा
१०.दंत व मुखरोग आरोग्य सेवा
११.वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार
१२. प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा
१३.आयुष व योग
….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech