पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द

0

नवी मुंबई: गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. एैतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजचा दिवस पवित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारले की चैतन्य येते. थोर पुरुषांचे महत्व, माहिती असणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. स्वराज्य रक्षणासाठी मुठभर मावळे होते. पण त्यांची मूठ मजबूत होती. या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. आयुष्याची राखरांगोळी होईल हे माहित असून सुध्दा आयुष्य पणाला लावणारी तानाजीसारखी माणसे महाराजांनी तयार केली. आयुष्य कसे जगावे हे दाखविण्यासाठी या परिसरामध्ये ‘तुम्ही जे-जे मागाल ते देईन’ असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, आजचा सोहळा गौरवाची बाब आहे. पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहे. मात्र तो डोंगराळ म्हणून घोषित व्हावा. सध्या या परिसराला “क” वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे. तो “ब” वर्ग केला जाईल. वाढते पर्यटक लक्षात घेता, याठिकाणी लवकरच बचतभवन उभे केले जाईल. त्यात प्रशिक्षण आणि विक्रीची सुविधा असेल. 5 कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकुल उभे केले जाईल. प्रशासकीय इमारत तालुक्यासाठी लवकरच उभी केली जाईल. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने एक वेगळे वैभव प्राप्त झाले. असेही कु.तटकरे म्हणाल्या.

आ.भरत गोगावले यांनी प्रास्ताविक करून तालुक्याच्या विविध समस्या मांडल्या. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते कृषि विभागाच्या शेतकरी योजनेच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचेही व्याख्यान झाले. चंद्रकांत कळंबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech