नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

0

रत्नागिरी:नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही . नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. पंचायत समिती सभागृह मंडणगड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले, खार जमिन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगड बंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंचायत समिती मंडणगडच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी तसेच ग्रामीण भागातील जोडरस्ते दुरुस्तीसाठी लवकरच निधी दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. सत्तार यांनी हर्णे बंदराची पाहणी केली. हर्णे बंदरावर जेट्टी उभारण्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याची कार्यवाही केली जाईल. तुळशी येथील महिला बचतगटांना भेट देवून बचतगटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हळद लागवडीची पाहणी केली. मंडणगड तालुक्यातील आंबडवे या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी भेट देवून तेथील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी याकुब बाबा दरगाहला भेट दिली तसेच आडखळ खाडीची पाहणी करुन खाडीमध्ये साचलेला गाळ उपसून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech