‘तौक्ते’ चक्रीवादळ; महावितरणच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश

0

 

मुंबई: ‘तौक्ते’ चक्रीवादळ; महावितरणच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश. अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘तौक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे वेगवान वादळासह मुसळधार पावसाचा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणची यंत्रणा सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी स्थानिक पातळीवर ताबडतोब पूर्वतयारी सुरु करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिले आहे.
चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. सोबतच महत्वाचे उपकेंद्र आणि भांडार केंद्रांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सोबतच यंत्रणा दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे ज्या भागात पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. मंडलस्तरीय दैनंदिन सनियंत्रण कक्षाकडून वीजपुरवठ्याबाबत माहिती, वीजयंत्रणेचे नुकसान तसेच इतर आवश्यक माहिती मुख्यालयातील कक्षाला पाठवण्यात येणार आहे. तसेच वीजयंत्रणेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यास वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी इतर ठिकाणीहून अभियंते व कर्मचारी संबंधीत दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech