राज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मिळणार शासकीय अनुदान – शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

 

मुंबई, दि. २९ :राज्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणा-या सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. येत्या दोन महिन्यात सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याची कार्यवाही  पूर्ण करण्यात येईल. तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील १५ दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनुदान पात्र शाळांमध्ये अघोषित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल  केल्यास पात्र होणा-या माध्यमिक शाळा / घोषित उच्च माध्यमिक शाळा / तुकड्यांचा समावेश असून याअंतर्गत १ हजार २७९ शाळा व १ हजार ८६७ तुकड्या आहेत. यात ९ हजार ९०१ शिक्षक व ४११ शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ११ अर्धवेळ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शाळा व तुकड्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच १९ सप्टेंबर २०१६ अन्वये २० टक्के अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यात १ हजार ६२८ शाळा व २ हजार ४५२ तुकड्यांचा समावेश असून याअंतर्गत १४ हजार ३६३ शिक्षक व ४ हजार ८८४ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत असून यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे श्री. तावडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech