आंतरजातीय विवाह संदर्भातील कायद्याचा मसुदा तात्काळ तयार करावा – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

0

 

मुंबई, दि. 3 : आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा करण्याबाबत गठित समितीची आढावा बैठक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीची व्याप्ती वाढविण्यासाठी यामध्ये आणखी सदस्यांची नियुक्ती करावी. तसेच आंतरजातीय विवाह कायदा करण्याबाबतचा मसुदा तात्काळ तयार करावा, अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री श्री.बडोले यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य तथा आंतरजातीय विवाह कायदा समितीचे अध्यक्ष सी. एस. थुल तसेच समितीचे सदस्य विधी व न्याय विभागाचे सह सचिव अविनाश बनकर, सहयोगी प्रा. डॉ. संदेश वाघ, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, श्रीमती राही भिडे हे समितीचे सदस्य तसेच समितीचे सदस्य सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे  उपस्थित होते.

श्री. बडोले पुढे म्हणाले, आंतरजातीय विवाह कायदा सर्व समावेशक होईल या दृष्टीने कायद्याचा मसुदा तयार करावा. वेगवेगळ्या विभागात जाऊन आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्प्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी काय आहेत याही समजावून घ्याव्यात, अशा सूचना श्री. बडोले यांनी यावेळी  दिल्या.

श्री. थुल यावेळी म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्प्त्यांना त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबतची माहिती देण्याबाबत सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्प्त्यांना संरक्षण देण्याबरोबर त्यांना भविष्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही लाभ देणे आवश्यक आहे, अशी सूचना श्री. थुल यांनी यावेळी केली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech