20 लाख खेळाडूंची नोंदणी झालेली सीएम चषक स्पर्धा देशात वैशिष्ट्यपूर्ण – मुख्यमंत्री

0

ठाणे, दि. 2 : 20 लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक स्पर्धा देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून ही नोंदणी 50 लाखावर जाईल असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याण जवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फूटबॉल अंतिम सामन्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला

प्रारंभी आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व मराठवाड्यात सहा ठिकाणी आपण जलयुक्त शिवारची कामे सुरू केल्याची माहिती दिली.

हारजीत महत्वाची नाही, संघभावनेतून केलेला खेळ महत्वाचा आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते,सांघिक भावना वाढीला लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मंदिरा पेक्षा युवकांनी फूटबॉल मैदानावर जावे.

एनआरसी कामगारांच्या पाठीशी

कल्याण भागातील एनआरसी सारखी मोठी कंपनी अडचणीत आली आहे, कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर निश्चितपणे तोडगा काढून कामगारांचे संसार वाचविण्यात येईल तसेच रिंग रूट मध्ये ज्यांची घरे जात आहेत त्यांच्याबाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले

प्रारंभी आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप देऊन मुख्यमंत्र्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर,खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, उपमहापौर श्रीमती भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके यांची उपस्थिती होती.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech