मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महंत कारंजेकर बाबांच्या प्रकृतीची विचारपूस रिद्धपूर विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरु होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

 

अमरावती, दि. 14 :महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या श्री क्षेत्र रिद्धपूर येथील विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरु होऊन गतीने पूर्ण होतील. रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज कंवरनगर येथील महानुभाव आश्रमाला भेट देऊन महंत कारंजेकर बाबा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे, रवी राणा, महानुभाव प्रचारक मोहन दादा अमृते, महानुभाव परिषद विश्वस्त अविनाश ठाकरे, रिद्धपूरनिवासी वाईनदेशकर बाबा आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर महंत कारंजेकर बाबा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व विविध विषयावर चर्चा केली.  श्री क्षेत्र रिद्धपूर येथील विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. आराखड्यातील सर्व कामे गतीने पूर्ण करण्यात येतील. नांदेड येथील द्विज गोरक्षण मंदिरासाठी शासकीय समिती गठित करण्याच्या मागणीवरही निश्चित कार्यवाही होईल, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आश्रमाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लीळाचरित्राची प्रत, चांदीचे नारळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech