मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा -नाना पटोले

0

 

नागपूर :मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा . कोरोनामुळे बाधित रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करा, यासाठी स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले.

मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा .
सप्टेंबरच्या मध्यात मृत्यू दर वाढला होता. आता तो कमी होत आहे. मात्र तरीही ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर का वाढला याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला.

 

हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच सर्व धर्मदाय इस्पितळाना कोविड उपचार यंत्रणेमध्ये सक्रिय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या काळात चॅरिटी हॉस्पिटलनी नागरिकांसाठी कोरोना उपचाराकरिता स्वतःहून पुढे येण्याची अपेक्षा आहे. यात मागे राहिलेल्या हॉस्पिटलला गतिशील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी नागपूरमधील मृत्युदर का वाढला याची कारणे जाणून घेतली. गेल्या सहा महिन्यात कोरोना संदर्भात धर्मदाय रुग्णालयांनी गरीबांच्या सेवेसाठी काय केले या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. तसेच यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशांची कुठपर्यंत पूर्तता झाली. त्याबाबतचा आढावा घेतला.

नागपूरमध्ये सर्वसामान्य माणसाला आरोग्य यंत्रणेने बेडच्या उपलब्धतेबाबतची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी यंत्रणा लोकाभिमुख करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सामान्य नागरिकाला लाभ व्हावा यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागामध्ये कोरोना संदर्भातली तपासणी बाबतची दरपत्रके लावण्याचे निर्देशीत केले.

नागपूरमध्ये सध्या बेडची उपलब्धता आहे. ऑक्सिजन व औषधी देखील कमी नाही. त्यामुळे नागपूर महानगरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी व्हावी. तसेच अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणांहून येणाऱ्या अहवालाची तातडीने तपासणी करून अहवाल परत जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन नागरिकांनी या काळात महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या संपर्क व्यवस्थेचा लाभ घ्यावा. तसेच बिलांच्या तक्रारी व खाटांच्या उपलब्धतेबाबत 0712-2567021 या क्रमांकावर माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. नागपुर मधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 500 कोटी रुपये देण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे आपण स्वतः मागणी केली आहे. त्यामध्ये आणखी काही भर टाकून एक हजार कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करावा. या माध्यमातून उपलब्ध आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करावे, आपण स्वतः या संदर्भात पाठपुरावा करू असे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागासह शहरात उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिरिक्त 400 खाटा उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक सुविधा पूर्ण होत आहे. कोरोना चाचणी वाढविण्यासोबत सामान्य जनतेला आवश्यक सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या बैठकीला आमदार विकास ठाकरे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डि.एस.सेलोकर,अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गडेकर, अतुल लोंढे व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षांची कोविड हॉस्पिटलला भेट

मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा

नागपूर, दि. 3 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधाची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज तेथे भेट देऊन घेतली.

रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्ची माहिती असलेला डॅशबोर्ड तसेच कॉम्प्युराईज्ड सिस्टिमची माहिती जाणून घेतली. रुग्णांची गैरसोय होणार नाही. गरीब व गरजू रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये याची दक्षता घेऊन रुग्णांना योग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

मेयो हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटल येथील पी.पी.ई. किट, पल्स ऑक्सीमीटर तसेच सिक्स मिनीट वॉकींगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयातील औषधी विभाग व नवीन बेड्ची पाहणी केली. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णास पाहता यावे यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कॉम्प्युटराईज्ड सुविधेची पाहणी करुन त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी अधिष्ठाता सजल मिश्रा यांच्याकडून माहिती घेतली.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech