मेट्रो – ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा पूर्ण

0

मुंबई : कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मेट्रो मार्ग ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी येथे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एकूण ७ पॅकेज असलेल्या या मार्गातील पॅकेज – ३ चा हा भुयारीकरणाचा पहिलाच टप्पा होता. मेट्रो -३ मार्गिकेतील पॅकेज -३ हे सर्वात लांब पॅकेज असून या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे.

पॅकेज-३ चे टनेल बोअरिंग मशीन ‘तानसा-१’ सायन्स म्युझियमच्या उत्तर दिशेपासून २७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यान्वित झाले. अनेक भौगोलिक आव्हानांना सामोरे जाऊन अप लाईन बोगद्याचे २ हजार ७३ मीटर भुयारीकरण पूर्ण केले आहे. या भुयारीकरणासाठी १ हजार ३८१ सेगमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला आहे. एकूण १७ टीबीएम सध्या ३३.५ किमी लांब मार्गिकेवर कार्यरत आहेत.

वाहतुकीच्या दृष्टीने कुलाबा – वांद्रे – सीप्झ हा मेट्रो मार्ग ३ महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाच्या समस्या सुटतील. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मेट्रो -३ मार्गिकेवरील काम प्रगतीपथावर असल्याचे बघून आनंद वाटला. प्रकल्पाचे  आतापर्यंत जवळपास ७८ टक्के भुयारीकरण व ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. एमएमआरसी याच उत्साहाने व गतीने प्रकल्पाचे काम सुरू ठेवेल, असेही मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजीतसिंह देओल म्हणाले,  प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आनंद आहे. आमच्या अभियंत्यांच्या व तज्ज्ञांच्या टीमने हे आव्हानात्मक काम सुलभरित्या पार पाडले आहे. आतापर्यंत उपनगरीय रेल्वेद्वारे न जोडली गेलेली मुख्य व्यापारी केंद्र पॅकेज-३ द्वारे जोडली जाणार आहेत. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यावर या भागात नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल, असेही श्री. देओल म्हणाले.

                                                                                   …..

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech