सीमाभागात मराठी भाषेच्या प्रसारासाठी नवीन उपक्रम राबवावेत

0

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच राज्याच्या सीमाभागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी उपक्रम राबविण्याचे निर्देश मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे दिले.

        मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांची आढावा बैठक डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी सादरीकरण केले.

मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आदी विविध उपक्रमांचा आढावा डॉ. कदम यांनी घेतला.

डॉ. कदम म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करावा. यासाठी विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांची मदत घेता येईल. तरुण पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी उपक्रम सुरू करावेत. मराठी चित्रपटसृष्टीचे मराठी भाषेमध्ये योगदान आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गीतकार, पटकथाकार यांना तसेच संकेतस्थळावर विविध माध्यमातून मराठीचा प्रसार करणाऱ्यांना पुरस्कार देण्यासंबंधी विचार व्हावा.

        मराठी भाषा नव्या पिढीपर्यंत पोचावी, यासाठी यूट्यूबवर बालगीते, कथा यांच्या छोट्या छोट्या चित्रफिती तयार करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विभागाच्या सहसचिव अपर्णा गावडे, राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक मीनाक्षी पाटील, भाषा संचालक नंदा राऊत, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव हर्षवर्धन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

                                                                                   ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech