शेतकरी जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू – वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

0

मुंबई, दि. ६ : राज्यातच नव्हे तर देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस उत्पादनामागे शेतकऱ्यांचे अथक परिश्रम असतात, त्यांनी पिकवलेला कापूस जागतिक वस्त्रोद्योग कंपन्या वापरतात. शेतकरीच जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

हॉटेल ताज येथील बॉल रूम मध्ये सी. आय. आय (कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) आयोजित वस्त्रोद्योग परिषदेत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी  श्री. देशमुख बोलत होते.

मोठ्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना या व्यवसायात आवश्यक संधी देऊन सहकार्याने प्रवाहात आणावे. राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर मोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या कापूस हमी भावाने खरेदी करावा असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, व्यवसायात शेतकऱ्यांना भागिदारी द्यावी त्यांच्या नवीन संकल्पनेला संधी द्यावी. लहान मोठ्या सूत गिरण्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्या. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मितीसाठी  प्रयत्न करावा. शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत करण्याची शक्ती असते त्यांना संधी दिली तर वस्त्रोद्योगात देश प्रथम क्रमांकांवर येण्यास फार काळ लागणार नाही.

वस्त्रोद्योग व्यवसायाची व्याप्ती  मोठी असून  देशातील प्रत्येकाच्या हाताला रोजगार  देण्याची ताकत या व्यवसायात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्यांनी गारमेंट चा व्यवसाय ग्रामीण भागात उभारावा. प्रत्येक कंपन्यांनी एक खेडे दत्तक घेऊन गारमेंट व्यवसाय उभारला तर त्या खेड्याचा आणि पर्यायाने या देशाचा विकास झपाट्याने होऊन देश समृद्ध होईल, असेही श्री. देशमुख यांनी या परिषदेत सांगितले.

यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता, विस्डम यार्नस लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक मनीष बाग्रोदिया, वझीर अडवायझर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत अग्रवाल, पॉलीस्टर रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड चे आर.डी. उडेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech