सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध – प्रा.राम शिंदे

0

 

मुंबई, दि. 4 :  राज्यातील भटक्या जमातीच्या मुला-मुलींना राज्य शासनामार्फत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक यांच्या नावे पुरस्कार देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची शैक्षणिक प्रगती करणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्ग मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यातून व विभागातून 10 वी 12 वीच्या परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या 41 गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक पुरस्कार वितरण प्रसंगी  ते बोलत होते.

विजा, भज प्रवर्गातून 10 वी व 12 वीच्या परीक्षेमध्ये राज्यात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रत्येकी 1 लाख रोख, स्मृतीचिन्ह तसेच विभागीय परीक्षा मंडळातून (बोर्डातून) सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रत्येकी 51 हजार रोख व स्मृतीचिन्ह यावेळी देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टिने व भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा शाससनाचा मानस असल्याचे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले,  हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांनी विमुक्त जमातीसाठी केलेले कार्य यावरुन 1 एप्रिल 2017 पासून विजाभज विभाग अस्तित्वात आला आहे. या अंतर्गत 970 आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळेत 2 लाख 28 हजार विद्यार्थी शिकत असून 2384 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद या विभागास आहे. या विभागामार्फत समाजातील प्रत्येक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समाज्याच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे.

राज्यातील 970 शाळांच्या मूल्यमापनासाठी संहिता तयार करण्याचे काम चालू आहे. लवकरच संहिता जाहीर करुन निर्गमित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विजाभज समाजातील कुटुंबाना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंतचे बिगर व्याजी कर्ज देण्याची योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच स्कॉलरशिपच्या प्रश्नासंदर्भात डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. जातपडताळणी संदर्भात रक्ताच्या नात्यातील एकाची जात पडताळणी झाली असेल तर पुराव्याची गरज असणार नाही. तसेच अनुसुचित जाती जमाती प्रमाणे विमुक्त जाती जमाती, भटक्या जमाती यांना क्रिमीलेअरची अट राहू नये असा प्रस्ताव विभागाच्या विचाराधीन आहे.

श्री.येरावार म्हणाले, विभागातील प्रत्येक घटकाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती साधणे हे आमचे ध्येय आहे. या विभागाच्या माध्यमातून विजाभज समाजाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे तसेच त्याची अंमलबजावणी गतीने होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्ग राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता, विजाभज संचालक शरद अहिरे, प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, सहसचिव भा.र. गावित तसेच गुणवंत विद्यार्थी पालक वर्ग व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट आयोजनासंबंधित पालक व विद्यार्थ्यांनी विशेष प्रशंसोद्गार काढले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech