नवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय – जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

0

 

पुण्यातील नवीन मुठा उजवा कालव्याला दोन महिन्यांपूर्वी भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेमुळे आठशेहून अधिक घरे बाधित झाली. या कालव्याचे अस्तरीकरण तसेच सर्वंकष दुरुस्तीबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आगामी बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य ॲड. राहूल कुल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. शिवतारे बोलत होते. यावेळी त्यांनी माहिती दिली, जलसंपदा विभागाच्या अधीनस्त प्रकल्पांच्या विस्तार व सुधारणा, विशेष दुरुस्तीसाठी मंजूर योजनांतर्गत अनुदानाच्या 2 टक्के निधी यापूर्वी ठेवला जात होता. शासनाने कालच याबाबत नवीन निर्णय केला असून त्यानुसार 10 टक्क्यांपर्यंत निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली  आहे. यामधून नवीन मुठा कालव्याच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

श्री. शिवतारे पुढे म्हणाले, नवीन मुठा कालव्यातून पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वर्षाचे बाराही महिने 24 तास पाणी सुरू असते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीला वाव मिळाला नाही. पुणे महानगरपालिकेने 1 महिना कालवा बंद ठेवण्यासाठी मान्यता दिल्यास कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे सोपे होईल. सिंचनासाठीचे कालवे बंद पाईप लाईन करण्याबाबत शासनाची भूमिका असून याबाबतही पुढील काळात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

नवा मुठा उजवा कालवा फुटून घडलेल्या दुर्घटनेत 730 कुटुंबे अंशत: तर 90 कुटुंबे पूर्णत: बाधित झाली आहेत. पूर्णत: बाधित झालेल्यांना प्रति कुटुंब 11 हजार रुपये  तर अंशत: बाधित  कुटुंबांना 5 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 3 कोटी रुपये नुकसान भरपाई वितरण करण्याचे काम सुरू आहे. बाधित कुटुंबांची दुर्घटनेमध्ये  वाहून गेलेली कागदपत्रे पाहता त्यांना नवीन दाखले वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासनाला शिबीरे भरविण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही श्री. शिवतारे यावेळी म्हणाले.

या लक्षवेधीवरील चर्चेत  सदस्य अजित पवार, माधुरी मिसाळ यांनी सहभाग घेतला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech