किमान आधारभूत किंमतीत धान आणि भरड धान्याची खरेदी सुरु

0

मुंबई, दि. 6 : शेतकऱ्यांना कमी भावाने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्यात 2017-18 या हंगामासाठी 5 ऑक्टोबरपासून धान्य खरेदी सुरु करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमतीचा लाभ होण्यासाठी राज्य शासनातर्फे धान्याची(एफएक्यू प्रतीचे धान व भरड धान्य) खरेदी करण्यात येते. या वर्षीचा पणन हंगाम लवकर सुरु करण्यात आला असून, खरेदी केंद्रेही अधिक प्रमाणात उघडण्यात येत आहेत. खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन करुन मालाचे पूर्ण पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सात दिवसांच्या आत जमा होणार आहेत.

हंगाम 2016-17 मध्ये मंजूर 757 केंद्रांपैकी 402 खरेदी केंद्र उघडण्यात आली होती. या हंगामातही जास्तीत जास्त खरेदी केंद्र उघडण्यात येतील. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या असून धान- रु. 1550/-, ज्वारी-रु. 1700/-, बाजरी – रु. 1425/- व मका- रु. 1425/- या प्रमाणे खरेदी करण्यात येतील.

राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते, तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी राज्य शासन, मान्यता प्राप्त अभिकर्ता संस्थेमार्फत करण्यात येते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech