मराठी बातम्या 07-09-2020

0

संकटमोचक आणि बहुआयामी व्यक्तीमत्व ही प्रणबदांची ओळख– विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

     मुंबई दि.7  :  माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एका महान मुत्सद्दी नेत्याला गमावले आहे. प्रणबदा यांचा विविध विषयात सखोल अभ्यास होता. संकटमोचक असणारे प्रणबदा हे बहुआयामी व्यक्तिमत्च होते, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.

          विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

प्रणब मुखर्जींच्या कामाचा प्रभाव देशावर प्रदीर्घ काळ राहील — मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

                    विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रणबदा यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून केलेले काम देशासाठी महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. मला सुध्दा त्यांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली.

                    सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, प्रणबदांबद्दल मॅन फॉर ऑल सिझन असे म्हटले जाऊ शकते. देशाच्या विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

          महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील किमान 60 वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. इतिहासातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रणबदा यांचे नाव घ्यावे लागेल.

          नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 15 पुस्तके लिहिणारे प्रणबदा हे उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखले जायचे. ते एक कुशल प्रशासक होतेच पण त्याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करुन आपल्या कामाची छाप सोडली.

          जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, परराष्ट्र व्यवहार समिती प्रमुख, आंतरराष्ट्रीय नाणे निधीमधील त्यांचा सहभाग, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक आहे.

          सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, प्रणबदांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते.

          विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले प्रणबदा यांची संकटमोचक अशी ओळख होती. कायदा आणि इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापकी आणि पत्रकारिताही केली. कुशल प्रशासक, उत्तम स्मरणशक्ती असलेल्या प्रणबदा यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक ठरले.

००००

 

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर जनसामान्यांतील लोकप्रिय नेता – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

 

          मुंबई, दि. 7 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. संयमी अभ्यासक, जनसामान्यांतील लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख होती, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी मुख्यमंत्री  शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली.

          विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            माजी  मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे महाराष्ट्राच्या विकासात येागदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने हे नेतृत्व आपण कायमचे गमावले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी योगदान दिले. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी आग्रही असणाऱ्या पाटील-निलंगेकर यांनी मुख्यमंत्री म्हणून तडफेने काम केले.

          सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ते जुन्या काळातील उच्च विद्याविभूषित होते. हैद्राबाद मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या पाटील-निलंगेकर यांनी आपले जीवन जनसामान्यांसाठी वाहिले. लातूरमध्ये शिक्षणसंस्थेची स्थापना करुन शिक्षणगंगा या भागात आणली.

          महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे जीवन संघर्षमय होते. शेतीपासून आरोग्य क्रांती असा प्रवास करताना त्यांनी लोकन्यायालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामतही आपले योगदान दिले.

          जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, अनेक प्रश्नांविषयी आग्रहाने आपली भूमिका मांडणारे शिवाजीराव हे जनसामान्यांत वावरणारे नेते होते. प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर देणे, निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची पध्दत वाखाणण्यासारखी होती.

          नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे एक उत्तम अभ्यासू, कुशल संघटक आणि लोकप्रिय नेते होते. महाराट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.

          विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी निलंगेकर यांनी मोठे योगदान दिले. मितभाषी, शांत, सुस्वभावी आणि संयमी असा त्यांचा स्वभाव होता.मराठवाडा विकासासाठी 42 कलमी, विदर्भ विकासासाठी 33 कलमी तर कोकण विकासासाठी 40 कलमी कार्यक्रम त्यांनी सर्वप्रथम राबविला. महसूल, जलसंपदा, आरोग्य, पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महत्वपूर्ण आहे.

००००

 

सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता हीच अनिल भैय्या राठोड यांची ओळख – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

 

          मुंबई दि.7  : शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध असणारे अनिल भैय्या राठोड यांची खरी ओळख सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता अशीच होती. अहमदनगरच्या विकासात योगदान दिलेल्या अनिल भैय्यांची खरी ओळख सामान्य कार्यकर्ता अशीच असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

          विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री अनिल भैय्या राठोड यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल भैय्या यांनी लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम केले. लोकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. नगर जिल्हयातून 25 वर्षे आमदार म्हणून निवडून येत असले तरी सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. अनिल भैय्या यांच्या जाण्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांना आदरांजली वाहिली.

          महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, गरीब कुटुंबातून आलेले आणि राजकारणाचा कोणताही वारसा नसतानाही लोकप्रिय नेते म्हणून अनिल राठोड यांचे नाव घ्यावे लागेल. पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी कायम भर दिला.

          नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणारे नेते अशी अनिल राठोड यांची ओळख होती.

          विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल राठोड यांचे वेगवेगळया सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेशी संबंध होते. सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा त्यांचा प्रयत्न असायचा. आताच्या लॉकडाऊन काळात त्यांनी सर्वसामान्यांसाठी अन्नछत्र सुरु केले होते.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वश्री सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्ण पाटील, सितलदास हरचंदानी, सुनिल शिंदे, श्यामराव पाटील, अण्णासाहेब उढाण, सुरेश पाटील, रामरतन बापू राऊत, मधुकर कांबळे, श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्तावही मांडला.

००००

 

विधानपरिषद : प्रणबदांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सर्वांसाठी मार्गदर्शक– उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबई, दि. 7 : प्रणबदांनी राष्ट्रपतीपदाला न्याय दिलाच परंतु त्यांच्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी महत्वाची खाती सांभाळली. यातूनच त्यांची क्षमता सिद्ध होते. प्रणबदांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आणि सर्वांसाठी मार्गदर्शक होते. अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

          विधानपरिषदेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे तसेच कोरोना योद्ध्यांना व कोरोना काळात मृत्यु पावलेले नागरिक यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. तो विधानपरिषदेत सहमत करण्यात आला.

          माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या निलंगेकर साहेबांचे निधन आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम लक्षात राहणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी योगदान दिले. त्यांचा स्वभाव संघर्षाचा होता. समाजासाठी लढणारे, संघर्ष करणारे नेतृत्व होते. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेले काम नेहमीच स्मरणात राहील.

          सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण चळवळीत व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे श्री. पवार म्हणाले. शैक्षणिक विकास, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नावर ते लढत राहीले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी संघर्ष केला.

          श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य रामनाथ मोते यांच्या निधनाने साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले, शिक्षण आणि शिक्षक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व आपण गमावले आहे. सर्वसामान्यांपैकी व सामान्यांमध्ये रमणारे ते नेतृत्व होतं. मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या आमदारांपैकी ते होते. ते शिक्षक नेते असल्याने अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण व शिक्षक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

          सभागृहाचे माजी सदस्य बलभीमराव देशमुख यांच्याबद्दलही शोकभावना व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटीसारख्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या बी.एन. देशमुख साहेबांनी उच्च आणि सर्वोच्च अशा दोन्ही न्यायालयात वकीली केली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणूनही काम केले. ते विद्वान होते. व्यासंगी होते. कायद्याचे ज्ञान व सामाजिक प्रश्नांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सभागृहात आणि न्यायालयाच्या माध्यमातून ते लढत राहिले.

          श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य युनुस हाजी जैनोद्दिन शेख यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. शेख यांच्या निधनाने सामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविणारा नेता हरपला आहे.

          सभागृहाचे माजी सदस्य जयवंतराव ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना श्री. पवार म्हणाले, त्यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले. नाशिकमधील साहित्य चळवळीशी ते जोडले गेले होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.

कोरोना योद्ध्यांना व नागरिकांना श्रद्धांजली

          उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, सध्या राज्यात आणि देशात आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. या लढाईत आपले, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, पोलीस बांधव, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनता कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देत आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लोकांचा जीव वाचविण्यासाठी मागील सहा-सात महिने कोरोना विरुद्ध लढा देत आहे.

          कोरोना विरुद्धच्या या लढाईत अनेक कोरोना योद्ध्यांचा मृत्यु झाला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना तसेच नागरिकांना श्रद्धाजंली अर्पण करतो. या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, सहकार्यातून कोरोनाविरुद्धची लढाई लवकरच जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

००००

प्रणबदांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

          मुंबई, दि. 7 : प्रणबदांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असे होते. केंद्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रणबदांचे केंद्रीय कॅबिनेटच्या सब कमिटीचे काम आपणा सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी आहे. प्रणबदांची कारकीर्द कायमच स्मरणात राहणारी आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

          माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. पाटबंधारे मंत्री पदाची कारकीर्द कायमस्वरूपी स्मरणात राहणारी अशी होती.

          सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभिमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे यांच्या निधनाबद्दलही सभापतींनी शोकभावना व्यक्त केल्या.

          उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील, निरंजन डावखरे, सुरेश धस, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, भाई जगताप आदींनी शोक प्रस्तावावर शोक भावना व्यक्त केल्या.

00000

उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा

          मुंबई, दि.7 :- विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणुक उद्या मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर, 2020 रोजी होईल, अशी घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत केली.

0000

क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या  – छगन भुजबळ

अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांचा केला सत्कार

मराठी बातम्या 07-09-2020

            मुंबई : दि. 7 :- अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.

            मंत्रालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या 3 ते 4 वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

            अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेल.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech