महिंद्रा कंपनीतर्फे ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी 14 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द

0

मुंबई: राज्यशासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर निधी अंतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे चौदा कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधान भवन येथे महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम, महिंद्रा कंपनीचे अधिकारी शितल मेहता आदी उपस्थित होते.

राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रमुख विकासाच्या स्पर्धाक्षम व समावेशी मूल्य साखळ्या विकसित करण्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनमार्फत सहयोगी खाजगी व वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य घेण्यात येत आहे. याअंतर्गत 14 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फांऊडेशनमधील एक हजार गावातील कृषी विकासासाठी खाजगी उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून रुपये 70 कोटी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला या प्रकल्पासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे 14 कोटी रु देण्याचे आश्वासन दिलेले होते. या प्रकल्पाचा कालावधी सात वर्षाचा असून एकूण अंदाजित खर्च रुपये 2100 कोटी इतका आहे. त्याप्रमाणे चौदाशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून अल्प व्याजदराने कर्ज घेण्यात येणार असून महाराष्ट्र शासन 560 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून खाजगी क्षेत्राचा सहभाग (सीएसआर) सुमारे 70 कोटी इतका असणार आहे.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech