‘महालक्ष्मी सरस’ने गाठला 15 कोटींच्या उलाढालीचा टप्पा बचतगट चळवळीमुळे गरीबी निर्मुलनास मदत

0

 मुंबई  : महालक्ष्मी सरस प्रदर्शनास मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून पुढील वर्षी प्रदर्शनात स्टॉलची संख्या वाढविली जाईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद दिला, यामुळे गावातील महिलांच्या आयुष्यातील गरीबी कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी येथे केले. यावर्षी जवळपास 15 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली.

        मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमार्फत 17 जानेवारीपासून राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन बीकेसी येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

        मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे 8 हजार स्वयंसहाय्यता समुहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी 50 लाखाची आर्थिक उलाढाली झाली होती तर यावर्षी जवळपास 15 कोटीची आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला आहे. महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांबरोबर 29 राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर सहभागी झाले होते.

                                                   सिताफळ रबडीरागी कुकीज आणि हातसडीचा तांदुळ

        प्रदर्शनात यावर्षी सिताफळ रबडी, आंबाडीचे ज्युस, रागी कुकीज हे ग्राहकांचे आकर्षण ठरले. तसेच जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा – पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ, गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी शोधून काढलेला एलईडी बल्ब, कोल्हापुरी चप्पल आदींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. यावर्षी गावातील महिलांच्या शेतकरी उत्पादक संघांनी गावातील भाजीपाला, चिकन व मटनाचा पुरवठा केला ही नाविन्यपूर्ण बाब होती.

                                                     उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचगटांना पारितोषिके

        सर्वाधिक विक्री – उत्पादने (महाराष्ट्र) या प्रवर्गात हरीओम स्वयंसहाय्यता गट, जि. लातुर यांना प्रथम क्रमांक, वरद विनायक स्वयंसहाय्यता गट, रायगड यांना व्दितीय तर विघ्नहर्ता स्वयंसहाय्यता गट यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक विक्री – उत्पादने (इतर राज्य) या प्रवर्गात शिल्पयान महिला बचतगट, पश्चिम बंगाल यांना प्रथम क्रमांक, रेणु हॅन्डलुम व हॅन्डी क्राफ्ट, मणिपूर यांना व्दितीय क्रमांक तर मेखा महिला बचतगट, केरळ यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

        सर्वाधिक विक्री – उत्पादने (फूड पॅराडाईज) या प्रवर्गात सामकादेवई स्वयंसहाय्यता गट, बीड यांना प्रथम, जयलक्ष्मी स्वयंसहाय्यता गट, नागपूर तर श्री वैष्णवीदेवी स्वयंसहाय्यता गट, ठाणे यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

        नाविन्यपुर्ण उत्पादने या प्रवर्गात एलईडी बल्ब लाईट गेल्यानंतर सुध्दा चार तास चालू शकतो असा शोध लावणाऱ्या हरिओम स्वयंसहाय्यता गटास गौरविण्यात आले.

        उत्कृष्ट सादरीकरण व उत्पादने माडणी या प्रवर्गात संस्कृतीक स्वयंसहाय्यता गट, सातारा यांना प्रथम क्रमांक, आस्था स्वयंसहाय्यता गट, अमरावती यांना व्दितीय तर नरेंद्रछाया स्वयंसहाय्यता गट, लातुर यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

           नव उद्योग प्रवर्गात यशवंती शेतकरी उत्पादक कंपनी, पालघर यांचा गौरव तर सर्वाधिक म्हणजेच 62 लक्ष रुपयाचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या बीसी सखीचा गौरव करण्यात आला. तसेच न्युटी व्हिला, उपजीविका हॅब व सेंद्रीय शेतीचे प्रदर्शन मांडणी करणाऱ्या उत्पादक संघ, प्रभागसंघ, ग्रामसंघ व स्वयंसहाय्यता गट, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

           कार्यक्रमास उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला, तारक मेहता का उलटा चष्मा मधील कलाकार कोमल भाभी व रोशन सोधी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन मुख्य परिचालन अधिकारी रविंद्र शिंदे यांनी केले तर सुत्रसंलन राज्य अभियान व्यवस्थापक (एचआर) रामदास धुमाळे यांनी केले.

                                                                                         ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech