कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या

0

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

102 कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्याचे भूमीपूजन

रत्नागिरी :- आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपलं सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचं काम आपण सर्वजण मिळून करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते.

आजचा दिवस माझ्यासाठी तीर्थयात्रेचा दिवस आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा अर्थात शौर्यदिन साजरा करुन मी इथे आलोय आणि येथून आंगणेवाडीला जाणार आहे.

मुंबईतही समुद्र आहे आणि कोकणातही. पण कोकणातला समुद्र छायाचित्रणाच्या दृष्टीने स्वच्छ व नितळ आहे. हे मी दुर्गांचे छायाचित्रण करताना बघितलय. इथल्या मातीतील माणसंही अशीच निर्मळ आहेत. अशा कोकणचा विकास करताना निधी कधीच कमी पडू देणार नाही. आपण आपल्या देवस्थांनाना देखील तितकं मंगलमय ठेवलं पाहिजे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

खासदार विनायक राऊत यांनी कोकणचा, विशेषत: तळकोकणचा विकास जलद गतीने व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची यावेळी भाषणे झाली.

समारंभापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकारी मंत्री व पदाधिकाऱ्यांसह येथील गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते येथील मंदिर परिसर विकासकामांचे भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण झाले. मंदिर संस्थानातर्फे यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

आराखड्याच्या मुख्य भूमीपूजनाचा सोहळा आठवडा बाजारालगत असलेल्या रस्त्याच्या कामाने झाला. येथे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री ॲड अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे यांनी आभार मानले.

असा आहे आराखडा.

टप्पा क्र. 1

· श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपती मंदीराचे तसेच परिसर संबंधित आराखडयातील कामे
· श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे
· पाणीपुरवठा योजना व स्वच्छता संदर्भातील कामे
· अधिक क्षमतेचे सार्वजनिक स्नानगृह व शौचालय बांधणे
· पर्यटक व भाविकांना समुद्र स्नानाकरिता सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यावर जागा आरक्षित करुन बोयेज टाकणेबाबत.

टप्पा क्र.2

· सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन
· वाहनतळ, सौर ऊर्जा कामे

टप्पा क्र.3

श्री क्षेत्र गणपतीपुळे गावातील व परिसरातील रस्ते , हा आराखडा 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech