खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण

0

– अजित पवार

मुंबई : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांची उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल, खेळाडूंना देण्यात येणाऱ्या भोजनभत्ता, ट्रॅकसुट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान होणाऱ्या प्रवासाला तसेच पायाभूत सुविधांसह खेळाचे साहित्य घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला देय असलेली रक्कम तत्काळ वितरीत करण्यात यावे असे निर्देश देवून यावर्षी देण्यात येणारा शिवछत्रपती पुरस्कार हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी वितरीत करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले, नोकरभरतीमध्ये 5 टक्क्याचे आरक्षण आहे. यामध्ये गट ‘ब’ व गट ‘क’ वर्गामध्ये शालेय स्पर्धांच्या सब ज्युनिअर व ज्युनिअर गटाच्या स्पर्धांना वेगवेगळा दर्जा दिला असून यामुळे महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंचे नुकसान होत आहे. यासाठी 5 टक्के आरक्षणामध्ये शालेय स्पर्धांना व राज्यक्रीडा संघटनांच्या स्पर्धांना एकच दर्जा देणार आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन निर्माण व्हावे यासाठी बालेवाडी येथील जागा उपलब्ध करुन ऑलिम्पिक भवनासाठी अनुदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून राज्य क्रीडा संघटनांच्या खेळाडू प्रशिक्षण शिबीरासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार म्हणाले, उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी होणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले असेल तर विचार मजबूत होतात. यासाठी खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आज जगात सर्वाधिक युवकांची संख्या आपल्या देशात आहे. मात्र आपला युवक वर्ग हा समाजमाध्यम आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. युवकांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून लवकरच नवीन योजना आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी तालुका क्रीडा संकुलांची अपूर्ण कामे करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विविध सुविधा मिळण्याकरिता देण्यात येणारा निधी वाढवून मिळावा अशा सूचना मांडल्या.

या आढावा बैठकीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बाकोरीया, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, अवर सचिव ए.आर.राजपूत, सहाय्यक संचालक सुहास पाटील आदि उपस्थित होते.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech