खासदार अहमद पटेल यांच्या निधनामुळे उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेला नेता काळाच्या पडद्याआड- अशोक चव्हाण

0

मुंबई : खासदार अहमद पटेल यांच्या निधनामुळे उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेला नेता काळाच्या पडद्याआड. ज्‍येष्‍ठ नेते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोक संदेशात श्री. चव्हाण म्हणाले की, खासदार अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.

मागील अनेक वर्षांपासून मी खा. अहमद पटेल यांच्याशी संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारी विषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. खा. अहमद पटेल यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे श्री. चव्हाण म्हणाले.

 

 

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech