कामगारांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

0

यवतमाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्यावतीने कामगारांना 29 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. यात कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, विवाहासाठी अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती, सुरक्षा किट, मृत्यु पश्चात कामगारांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य, पुस्तकांचे वितरण आदींचा समावेश आहे. कामगारांसाठी असलेल्या या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

दारव्हा रोडवरील गंगाकाशी लॉन येथे आयोजित विविध कल्याणकारी योजनेच्या लाभ वाटप सोहळयात ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, नितीन भुतडा, विजय खडसे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत 73 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कामगार कल्याण महामंडळाच्या योजनांसाठी 20 हजार कोटींची तरतूद आहे. सुईपासून ते विमान बनविण्यापर्यंत कामगारांचे योगदान आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ‘श्रममेव जयते’ चा नारा देऊन कामगारांना श्रमप्रतिष्ठा मिळवून दिली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक गरजू आणि पात्र कामगारांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आता कामगारांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात येईल. आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी देण्यात आलेल्या सुरक्षा किटचा कामगारांनी योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविकात कामगार अधिकारी राजदीप धुर्वे म्हणाले, कामगारांच्या नोंदणीमध्ये यवतमाळ जिल्हा अग्रेसर आहे. आतापर्यंत 32 हजार कामगारांना सुरक्षा किट, 26 हजार कामगारांना विविध कामगार योजनेंतर्गत 16 कोटींचे अर्थसहाय्य तर 500 कामगारांना पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. अटल आवास योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना दीड लक्ष रुपये तर शहरी भागातील कामगारांना दोन लक्ष रुपये देण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रविकांत दुधकर (30 हजार रुपये), प्रभाकर नागापुरे (60 हजार रुपये), सुधाकर जाधव यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीकरीता 10 हजार रुपये, सोनल पाटील (शिष्यवृत्तीकरीता 24 हजार रुपये), मेघा ठाकरे यांच्या मुलाच्या इंजिनियरींकरीता 60 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच लता अरसोड, अनिल वानखेडे यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीकरीता मंजूरी पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब शिंदे यांनी तर आभार राजू झामरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech