वाचन संस्कृती जोपासण्यावर राज्य शासनाचा अधिक भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचा पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ

0

कोल्हापूर,दि.5 : समाजात वाचन संस्कृती जोपासावी, वाढावी यासाठी राज्य शासनामार्फत वाचन आणि साहित्य संवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. साहित्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव हाही उपयुक्त उपक्रम असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.

वाचनाची आवड निर्माण व्हावी, जोपासावी यासाठी पुस्तकांचे गाव भिलार तसेच स्वागत सत्कार समारंभात गुच्छ देण्याऐवजी पुस्तके भेट देणे असे नव-नवे उपक्रम शासनामार्फत राबविले जात असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रंथालये नवनव्या पुस्तकांनी समृद्ध व्हावीत यातून समाजात वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने शासनाचे उपक्रम सुरू आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने व्यक्तीगत जीवनातही वाचनाची सवय आणि गोडी लावून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

शाळांपर्यंत आणि शाळांतील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचावी यादृष्टीने आपण व्यक्तीगतरित्या कै.भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्या माध्यमातून उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे फिरते ग्रंथालय शाळांच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानांच्या प्रवेशद्वारावर लावून त्याद्वारे ग्रंथ आणि पुस्तके मुलांपर्यत पोहोचविण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालयांनी वाचन चळवळीत अधिक सक्रीय होणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

समाजाला नवी दिशा देण्याची ताकद ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये आहे. संस्कृती रूजविण्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे आज काळाची गरज बनली आहे. वाचन संस्कृती समाजात रूजविण्यासाठी सामुहिक चळवळ उभी करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाचाल तर वाचाल, शिकेल तो टिकेल या उक्तीप्रमाणे समाजात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयांनी सक्रीय पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या जगात ग्रंथ आणि पुस्‍तकांचे स्थान अबाधित आहे. पुस्तकेही माणसाला घडवितात. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन भागीरथी महिला संस्थेच्यावतीने गावागावात वाचन संस्कृती रूजविण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

काळ कितीही बदलला तरीही ग्रंथ आणि पुस्तकांना अन्य पर्याय नाही. त्यामुळे आजच्या पिढीने माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रंथ आणि पुस्तकांची जोपासणा करून वाचन संस्कृती वाढविणे काळाची गरज आहे. ग्रंथ आणि पुस्तके लोकांपर्यत पोहोचावी यातून वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने ग्रंथोत्सव अतिशय उपयुक्त माध्यम असल्याचे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले. भारतात लक्षावधी हस्तलिखिते ग्रंथस्वरूपात जोपासले असून देशात ग्रंथांचा संग्रह मोठा आहे. ग्रंथातील थोर विचारामुळेच ग्रंथ आजही आजरामर राहिले आहेत. देशातील ग्रंथांचा इतिहास आणि ग्रंथ लेखकांच्या लेखनिच्या उर्मीचेत्यांनी कौतुक केले.

शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे राजर्षि छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.अशोक चौसाळकर, जिल्हा ग्रंथालय  संघटनेचे अध्यक्ष तानाजी  मगदूम आदी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech