उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

0

 

नवी दिल्ली, ३ : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणा-या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना  व दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा आज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडु यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आज जागतिक अपंगदिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार २०१८’ वितरीत करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडु यांच्या हस्ते  विविध १४ श्रेणींमध्ये महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांसह देशातील एकूण ५६ व्यक्ती व १६ संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, विजय सांपला आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला गामलींग यावेळी उपस्थित होत्या. राज्यातील चार दिव्यांगांचा सन्मान

राज्यातील चार दिव्यांगांचा सन्मान

नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे  यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडुचा पुरस्कार , पुणे येथील चार्टर्ड अकाऊंटंट भूषण तोष्णीवाल यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार, नाशिक येथील स्वयं पाटील याला सृजनशील बालकाचा पुरस्कार तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचा-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कांचनमाला पांडे यांनी १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले . अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये त्यांनी  १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. दहावी व बारावी मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्या बँकींगची तयारी करित होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या ३ वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहेत. मेक्सिको येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत कांचनमाला यांनी भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते व या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणा-या  त्या भारताच्या पहिल्या जलतरणपटू ठरल्या.

नाशिकचा स्वयं पाटील यास सृजनशील दिव्यांग बालकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मत: डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटील च्या हृदयाला छिद्र झाले यातून बरा होत नाही तर त्याच्यावर कानाशी संबंधीत तीन शस्त्रक्रिया झाल्या यातही त्याच्या आई -वडीलांनी खचून न जाता त्याला धिर देत सांभाळ केला. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिर येथे आता स्वयं सामान्य मुलांच्या शाळेत ५ व्या वर्गात शिकतो. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ स्थापीत केला आहे. अपंगत्वावर मात करून स्वयं सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेत आहे, तो उत्तम डांस करतो व विविध डांस स्पर्धांमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आहेत. स्वयंच्या याच अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सृजनशील बालकाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथील पिंपरी -चिंचवड भागात राहणारे भूषण तोष्णीवाल यांनी दृष्टीहीनतेवर मात करून आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप सोडली आहे, त्यांचे व्यक्तीमत्व सर्वांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरले आहे. आज ‘रोल मॉडेल’ चा बहुमान त्यांना मिळाला. स्वत:च्या आयुष्यातील संघर्षातून इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे भूषण हे उत्तम प्रेरणादायी वक्ते आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रासह जयपूर, जोधपूर, बॅग्लुरु, कलकत्ता आदी ठिकाणी ४०० च्या वर प्रेरणादायी विचारांचे कार्यक्रम केले आहेत. सद्या पुणे येथील ओरिएंटल इंश्युरंस कंपनीत लेखा विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

ठाणे येथील आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचा-यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे येथील क्षितीज स्कुल फॉर मेंटली चॅलेंज येथे कार्यानुभव  विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असून ते पूर्णत: कर्ण बधीर आहेत. ते या शाळेमध्ये मुलांना अगरबत्ती, मेणबत्ती, कागदी पिशव्या आदीं बनविण्याचे शिक्षण देतात. यासोबतच धावणे, गोळा फेक , लांब उडी आदींचे प्रशिक्षणही देतात. त्यांना सर्वोत्कृष्ट कर्मचा-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिव्यांगांसाठी कार्य करणारे डॉ योगेश दुबे आणि प्रा. रवी पुवैय्या यांचा सन्मान

मुंबईतील बोरीवली पूर्व येथील डॉ. योगेश दुबे दिव्यांगासाठी कार्यरत आहेत. त्यांनी दिव्यांगांसाठी शिक्षण , आरोग्य, कौशल्य विकास आदी क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी दिव्यांगाना आधार कार्डद्वारे लिंक करून दिव्यांग कनेक्ट ॲप सुरु केले असून हे कार्य भारतात प्रसिध्द झाले. दिव्यांगांना त्यांनी तीन चाकी वाहने, व्हिल चेअर, स्टिक आदी साधनांचे  मोफत वाटप केले त्यांच्या या वैविद्यपूर्ण कार्याची दखल घेऊन दिव्यांगांसाठी कार्यकरणा-या सर्वेश्रेष्ट व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी जेलो कॅम्युनीकेटर तंत्रज्ञान विकसीत केले या माध्यमातून मंदबुध्दी मुलांना आपल्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधण्यात मदत होते. हे तंत्रज्ञान आता फ्लॅशकार्डच्या माध्यमातही उपलब्ध आहे.

पिंपरी चिंचवड मनपा व पुणे येथील मॉडर्न कॉलेजला पुरस्कार

दिव्यांग पुरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थाना आज सन्मानीत करण्यात आले. या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संकेतस्थळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला  तर  खाजगी क्षेत्रात पुणे येथील मॉडर्न  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ठ ठरले  महाविद्यालयाच्या  प्रमुख ज्योत्सना एकबोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर स्किपींग लिंक्स, फाँट अँड कलर चेंजींग, प्रायर एचटीएमएल/सीएसएस टॅगींग अँड स्क्रीप्ट व्हॅलीडेशन आदी दिव्यांगाना पुरक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मॉर्डर्न महाविद्यालयाच्या संकेतस्ळाची मोझीला व गुगल क्रोम ब्राऊजरच्या नवीन तृतीय व्हर्जनवर जॉ १७ आणि एनव्हीडीए १६ रिडर्स च्या माध्यमातून चाचणी. संकेतस्थळाच्या प्रत्येक पानावर दिव्यांगासांठी सुगम्य हा पर्याय देण्यात आला आहे, जो दृष्टीबाधीतांना २०० टक्के पेक्षा जास्त आकारात हे पान मोठे करून  पाहण्यास मदत करते.

मुंबई येथील वरळी सिफेस भागातील नॅब इंडिया(नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लाईंड) या संस्थेला दिव्यांगासाठी रोजगार उपलब्ध करून देणा-या संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे महासचिव एस.के.सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech