होरिबा पाठोपाठ आणखी कंपन्या गुंतवणूक करतील मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास बुटीबोरीतील औद्योगिक वसाहतीत होरिबा प्रकल्पाचे भूमिपूजन

0

 

  • पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक
  • डिसेंबर 2019 पर्यंत प्रकल्पाला सुरुवात
  • राज्य सरकार आवश्यक त्या सुविधा देणार

नागपूर, दि. 15 : आज वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे. वैद्यकीय, विज्ञान, पर्यावरण आणि औद्योगिक या क्षेत्रासह अन्य क्षेत्रात जागतिक स्तरावर होरिबासारखी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीने आता राज्यात देखील पदार्पण केले आहे. वैद्यकीय हब असलेल्या नागपूर परिसरात ही कंपनी आपला प्रकल्प सुरू करणार असल्यामुळे या क्षेत्राला चालना मिळेल. या कंपनीच्या अनुभवावरून इतरही कंपन्या येथे गुंतवणूक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहतीत जपानच्या होरिबा कंपनीच्या वतीने होरिबा इंडिया  प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणा-या उद्योगाचे भूमिपूजन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, होरिबा कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जय हाखू, होरिबा इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गौतम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे येथील या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला गेलो असता होरिबा कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. जय हाखू यांना नागपूर येथे देखील प्रकल्प सुरू करण्याबाबत विचार करावा, असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी अत्यंत कमी कालावधीत या परिसरात प्रकल्प उभारण्याचा शब्द प्रत्यक्षात प्रकल्पाचे भुमिपूजन करून आज पूर्ण केला आहे. जपानी कंपन्या नवीन ठिकाणी आपले प्रकल्प उभारण्यास सहजासहजी पुढाकार घेत नाहीत. मात्र होरिबा या कंपनीने नागपूर या शहराचे महत्व ओळखून प्रकल्प उभारणीचा शुभारंभ केला.

वैद्यकीय क्षेत्रात ही कंपनी नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कंपनीला राज्य सरकार आवश्यक त्या सोयिसुविधा उपलब्ध करून देणार आहे. या कंपनीच्या अनुभवावरून इतरही जपानी कंपन्या भविष्यात येथे गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कंपनीच्या आगमनामुळे एक नवे क्षेत्र सुरू होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रोजगारसुध्दा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून होरिबा कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. हाखू म्हणाले, जगातील विविध देशात या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये सात हजारांपेक्षा जास्त व्यक्ती काम करीत आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने तसेच पायाभूत सुविधांचा विचार करता कंपनीने नागपूर येथे गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलेआहे.

बुटीबोरी येथील 12 एकर परिसरात उभारण्यात येणा-या या प्रकल्पात रक्तातील पेशी तपासण्यासाठीचे सेल काऊंटर मशीनचे उत्पादन तसेच त्यासाठी लागणा-या रसायनाचे उत्पादनदेखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या सेंट्रल वेअर हाऊसची उभारणी केली जाईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. डिसेंबर 2019 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. दुस-या टप्प्यात अधिक मोठी गुंतवणूक असेल. या प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. होरिबा इंडियाच्या भारतातील कुठल्याही प्रकल्पापेक्षा ही सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. जय हाखू यांनी केले. तर आभार होरिबा इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गौतम यांनी मानले. कार्यक्रमाला औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech