इ-समिट मधून तरुणांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन 22 हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय इ – समिटमध्ये सुमारे 20 ते 22 हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांनी सहभाग घेतला. एकूण 467 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. यामध्ये नागपूर, जळगाव, धूळे, औरंगाबाद, नाशिक, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. काल या समिटचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही अग्रगण्य संस्था आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत ही संस्था कार्य करते. ही संस्था आणि आयआयटीमार्फत आयोजित समिटला कल्पक विद्यार्थी उद्योजक, संशोधक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नावीन्यपूर्ण कल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड नाविन्यता सोसायटीतर्फे करण्यात आली होती. निवडलेल्या विद्यार्थ्यांना इ – समिटमध्ये विनाशुल्क सहभागी होण्याची संधी मिळाली. इ- समिटमध्ये आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

यंदाच्या समिटमध्ये उद्योग जगतातील दिग्गजांची उपस्थिती होती. विप्रोचे संचालक रशीद प्रेमजी, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप, ट्वीटरचे भारत विभागप्रमुख मनीष महेश्वरी, लिनीवोचे सीईओ राहुल अग्रवाल यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमात तरूणांना मार्गदर्शन केले.

समिटमध्ये लाईव्ह पिचिंग, स्टार्टअप एक्स्पो, आंतरवासिता व नोकरी मेळावा, नाविन्यता आणि उद्योजकता परिषद, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन कॉन्क्लेव, स्टार्टअप एक्स्पो, टेन मिनिट मिलियन चॅलेंज, सीड स्टार्स, हॅकेथॉन्स तसेच विविध कार्यशाळा तसेच स्पर्धा घेण्यात आल्या. स्टार्टअप सुरु करू इच्छिणाऱ्या तरूणांना या स्पर्धा आणि कार्यशाळेतून दिशादर्शक मार्गदर्शन मिळाले.

शिक्षण पूर्ण झाले की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा स्टार्टअप सुरु करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी नेमका कोणता मार्ग निवडावा याची माहिती नसते. अशा तरुणांसाठी हे दोन दिवसीय इ – समिट फार महत्त्वपुर्ण ठरले, अशा प्रतिक्रिया सहभागी तरुणांनी दिल्या.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात पुढे जाण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती अमित कोठावदे यांनी आपल्या चर्चासत्रात दिली.

                                                                                        ….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech