” कोव्हिड – १९ संक्रमणाच्या लॉकडाऊनमध्ये, सुदृढ शरीर व सात्विक मनाचे संवर्धन”.

0
    माझ्या सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार🙏
कसे आहात?  हसताय ना ? हसायलाच पाहिजे.
   सद्याचा जमाना  मैत्रीचा आणि मित्रत्वाच्या नात्याने दिलेल्या मौल्यवान सल्याचा… मैत्री जपा/ मैत्री वाढवा.
    फार दिवस झाले… एकत्र येऊन गप्पा मारल्या गेलेल्या नाहीत. सध्या, लॉकडाऊनमुळे आपल्या व्यक्तिशः भेटीगाठी होऊ शकणार नाहीत… त्यामुळे आज, आपापल्या घरात राहूनच, मी तुमच्या बरोबर, ह्या पत्राद्वारे गप्पा- संपर्क साधत आहे.
    सुदृढ – निरोगी शरीर व सात्विक- निर्मळ , परोपकारी मन, ह्यांचे संवर्धन कसे करता येईल…. ह्यावर बोलू काही.
     आज, सर्व जग एका विचित्र संक्रमण अवस्थेमधुन जात आहे.
   जगभरात, Nova- Corona (  नोव्हा करोना) किंवा COVID – 19 (कोव्हिड -१९). ह्या विषाणू – संसर्गाने थैमान घातले आहे. ह्याला आवर घालण्यासाठी जगभरातील सर्व देश अथक प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जवळपास सर्व देशांनी लॉकडाऊन,  हा एक उत्तम पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशातील सुजाण   नागरिक ह्या   लॉकडाऊन ला सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. लॉकडाऊनमुळे संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराला नियंत्रण बसते व कालांतराने तो प्रांत/ राज्य/ देश संसर्गमुक्त होतो व तेथील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.
    संसर्ग ( इन्फेक्शन) म्हणजे काय?… ह्यावर थोडा प्रकाश टाकतो.
    आपणास, संसर्ग केव्हा होतो?
     जेंव्हा एखादा सूक्ष्म- रोगकारक- जीव (मायक्रोऑर्गानिझम) आपल्या शरीरात प्रवेश करतो व आपणास हानी पोचवतो, तेंव्हा आपणास संसर्ग झाला, असे समजावे.
     जेंव्हा, संसर्गजन्य- सूक्ष्म-रोगकारक-जीव,आपल्या रक्तात वाढायला लागतात, तेंव्हा ताबडतोब, आपल्या शरीरातील मज्जारज्जू (बोन –  मॅरो), रक्तातील ( WBC) पांढऱ्या रक्त पेशींची संख्या , अनेक पटींनी वाढवतो. ह्यांतीलच बी- लिंफोसाईट्स किंवा बी- सेल ह्या विशेष –  प्रकारच्या- (WBC) पांढऱ्या रक्त पेशीमुळे, अँटीबॉडी ( प्रतीपिंड) तयार होऊन, त्या सूक्ष्म- रोगकारक- जीवा बरोबर लढा सुरु करतात.
    आपल्याला, संसर्ग झाल्याचा परिणाम म्हणजेच, लक्षणांच्या स्वरूपात आपल्याला ताप येवू लागतो. हा ताप आल्यामुळेच,  आपल्या शरीराचे जे  तापमान वाढते,  त्या वाढलेल्या तापमानामध्ये, ह्या सूक्ष्म- रोगकारक- जीवांचा नायनाट होता व आपण संसर्ग मुक्त होतो. ही अँटीबॉडी/अँटीडोट, आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या बनवण्याची प्रक्रिया, सर्वस्वी आपल्या सुदृढ रोग – प्रतिकारशक्ती –  प्रणालीवर अवलंबून असते.
   थोडक्यात, ज्याच्या शरीराची रोग- प्रतिकारशक्ती -प्रणाली उत्तम ( सुदृढ), तोच निरोगी.
    ह्या सूक्ष्म संसर्गजन्य जीवांना , PATHOGEN –  पथोजन ( रोगकारक जीव) असे म्हणतात.
     आता आपण, संसर्गजन्य – सूक्ष्म रोगकारक – जीवांचे, किती प्रकार असतात, ते पाहूया. त्यांचे महत्वाचे ५ प्रकार असतात:-
१) जिवाणू(बॅक्टेरिया),
२) विषाणू ( व्हायरस),
३) बुरशी (फंगस)
४) परजीवी  (प्रोटोझोअा)
५) जंत ( हेलमिंथ).
आता आपण हे पाहूया की, ह्या सूक्ष्म- रोगकारक -जीवांचा प्रसार/ संसर्ग कोणत्या पद्धतीने होतो:-
१) त्वचा- स्पर्श संपर्कामुळे,
२) शरीरातील स्त्रावांचे इतरांमध्ये आदानप्रदान/ संपर्कामुळे,
३) विष्ठा/ शौच संपर्कामुळे,
४) प्रदूषित अन्न/ पाणी,  ह्यांच्या सेवनामुळे,
५) आत घेतलेल्या श्वासाबरोबर, श्वसन – मार्गामध्ये गेलेल्या दूषित हवेतील कणांमुळे
किँवा
संसर्गजन्य आजारी व्यक्तीने शिंकल्यामुळे अथवा खोकल्यामुळे अथवा थुंकल्यामुळे, जे हवेत स्त्रावबिंदू पसरलेले असतात, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे,
६) संसर्गजन्य आजारी व्यक्तीने हाताळलेली वस्तू/ पदार्थ, दुसऱ्या व्यक्तीने हाताळल्यामुळे.
      आता आपण, ह्या रोगकारक जीवांचा फैलाव/ प्रसार, त्यांच्या कोणत्या गुणधर्मांवर/ वैशिष्ठ्यवर अवलंबून असतो ते
उदाहरणासहित  पाहूया:-
१) आकारमान,
२) मोजमाप,
३) कार्यपद्धती,
४) उत्पत्ती व वाढ ( आनुवंशिकता)
५) त्यांची शरीरावर आघात/ विनाश करण्याची क्षमता/ पद्धती
    उदा.दाखल जिवाणू व विषाणू यांच्यातील आकारमान  -वैशिष्ठ्यचा फरक पाहू:
लहानात लहान जिवाणू ( एका जिवाणूचे आकारमान अंदाजे १००० nm  नॅनोमीटर आहे) पेक्षा, विषाणू हा अत्यंत सूक्ष्म असतो ( एका विषाणूचे अंदाजे आकारमान २०४०० nm, नॅनोमीटर इतके अतिसूक्ष्म असते).
       कार्यपद्धती/ उत्पत्ती- वाढ , ह्या गुणवैशिष्ट्येचा दोहोंमधील फरक उदाहरणादाखल पाहू:-
विषाणू ( व्हायरस) हा यजमानाच्या शरीरात प्रवेश करून ,त्यांच्या पेशींवर कब्जा मिळवतो व त्यांना संपवून स्वतः ची अनेक पटींनी वाढ ( वसाहत) करत जातो……. त्याउलट, जिवाणूला ( बॅक्टेरियाला), स्वतःच्या अस्तित्वासाठी अथवा उत्पत्ती- वाढीसाठी शारीरिक पेशींची माध्यम म्हणून आवश्यकता नसते.
     आता आपण विषाणूंच्या , विविध संसर्गंपैकी, काही उदाहरणे पाहूया:-
१) कॉमन कोल्ड ( सर्दी):
सर्दी होण्यामागे, ऱ्हायनोव्हायरस किंवा करोनाव्हायरस किंवा अडेनोव्हायरस कारणीभूत असतो.
२) एनसेफालायटीस/ मेनेनजायटीस:-
ह्या मेंदुज्वाराला, एंटरोव्हायरस किंवा हरपिस सिंपलेक्स व्हायरस किंवा वेस्ट नाईल व्हायरस कारणीभूत असतात.
३) गॅस्ट्रोएनटरायटीस :-
 ह्या पोटाच्या विकाराला, नोरोव्हायरस, कारणीभूत असतो.
    एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे,  विषाणूजन्य संसर्गावर प्रतिजैविके (अँटीबायोटिक)  प्रभावी पडत नाही. परंतु, त्यांच्या लक्षणांवर कारक ठरणारे औषधोपचार  केले जातात व रोग्याला आराम पडतो.
     परंतु जिवाणू- संसर्गमध्ये प्रतिजैविके अतिशय परिणामकारकपणे लागू पडतात व  आपणास संसर्गपासून  पटकन व  संपूर्ण आराम मिळतो.
       ह्याचाच अर्थ, विषाणूजन्य -संसर्गावर आपल्या शरीरातील, नैसर्गिक- रोगप्रतिकारशक्ती – प्रणाली व आपली प्रबळ इच्छाशक्ती /सकारात्मक विचासरणी , परिणामकारकपणे संसर्गला प्रतिकार करते व आपणास संसर्गमुक्त करते.
     त्याचसाठी, आपण आपली नैसर्गिक  प्रतिकारशक्तीप्रणाली सुदृढ/निरोगी करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचा विचार करूया.
      आपली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीप्रणाली विकसित आणि सुदृढ/ निरोगी करायची असेल तर आपणास योग-आयुर्वेद मधील  त्रिसूत्री वापरावी लागेल, ती पुढीप्रमाणे आहे:-
१) पौष्टिक आहार,
२) विहार व योग/ व्यायाम,
३) सात्विक आचार आणि विचार.
१) पौष्टिक आहार:-
आपला आहार फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नसावा, तर तो चौरस व  सहा ( ६) मुख्य पौष्टिक घटकांनी युक्त असावा. ते सहा मुख्य घटक  म्हणजे ….
 पिष्टमय पदार्थ ( कार्बोहाइड्रेट),
प्रथिने (प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ ( फॅट्स), जीवनसत्वे(व्हिटॅमिन) , क्षार ( मिनरल)
 पाणी ( वॉटर).
     वरीलपैकी एक घटक जरी कमी पडला तर त्याचा शरीरस्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो व तुमच्या सुदृढ/निरोगी बनण्याच्या कल्पनेला लगाम लागतो.
२) विहार व योग/ व्यायाम:-
विहार म्हणजे स्वच्छंदी,    मनसोक्त, फुलपाखराप्रमाणे बागडण्याचा आस्वाद घेऊन, मन प्रफुल्लित(प्रसन्न) करणे.
      सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण बाहेर जाऊन विहार करू नये.
     त्यामुळे आपण, घरातच राहून मनमोकळेपणाने उड्या मारणे, तिथल्या तिथे धावणे, सूर्यनमस्कार/  दंडबैठका घालणे.
योगमधील प्राणायाम, अनुलोम – विलोम, सूर्यभेदन, ध्यान धारणा, ओमकार गुंजन ( प्रणव जप) आणि शवासन, इत्यादी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, दररोज सकाळी करावे.
यामुळे तुमचे शरीर तंदरुस्त आणि लवचिक बनेल, चयापचय क्रिया सुधारेल. रक्ताभिसरण सुधारेल.  मज्जासंस्था – स्मरणशक्ती तल्लख होईल.
     तसेच मनःशांती मिळून जीवनाकडे / जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल व आपण सकारात्मक विचार सरणीचा स्वीकार करायला सुरुवात करू.
३) सात्विक आचार आणि विचार :-
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सहा मनोकायिक शत्रूंवर (षडरिपुंवर) नियंत्रण ठेऊन,
आपल्या अचारणामध्ये / वागणुकीमध्ये  सात्विकपणा आणावा.
   आपल्या विचारसरणी/वागणुकीमध्ये सत्यता, वक्तशीरपणा, पारदर्शकपणा, निःपक्षपातीपणा,
निस्वार्थीपणा, अनुकंपा, प्रेमळपणा, मानवता, उदारपणा, करुणाभाव, दातृत्व  ह्या सद्गुणांची  जोपासना करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करावा.
    उदा. आपण आपल्या सभोवती स्वतःसाठी  सुदंर, सुरक्षित व सर्वोत्तम वातावरण –  निर्मितीची अपेक्षा/ स्वप्नं बाळगत असतो,  असेच सर्वोत्तम वातावरण दुसऱ्याला देखील उपलब्ध होवो अशी प्रार्थना- सदिच्छा आपल्या विचारांमध्ये असावी.
ह्यालाच सात्विक आचार/ विचार म्हणतात.
ह्या सात्विक आचार/ विचाराचा पाया, “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ”, ह्या सुभाशितामध्ये आहे, त्याचे आपण सर्वांनी आचरण करावे.
    उदा. आपण आपल्या दैनंदिन मासिक-खर्चामध्ये थोडीशी कपात करून ,  बचत झालेल्या पैशाचा वापर,   गरजवंतासाठी मदत म्हणून करू शकतो.
वंचित गरजवंताला, आज तो अडचणीत –  सापडलेला असताना मदत केली तर, तो गरजवंत आज  वाचेल/जगेल व उद्या भरारी घेऊन, स्वतःच्या कुटुंबाला उभारी देऊ शकेल. त्यामुळे सढळ हस्ते मदत करा.
     फक्त एक विनम्र विनंती, तुम्ही ज्या गरजवंताला दान/ मदत करणार असाल त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेऊन निस्वार्थीपणे मदत करा.
     आता, प्रश्न हा उपस्थित होतो की, आजच्या परि्थितीत वंचित/ गरजवंत कोण?
   आजच्या लॉकडाऊन मध्ये, रोजंदारीवर आपले पोट व संसाराचा गाडा चालवणारा कारागीर, जो आज बेरोजगार आहे,..किंवा ज्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे,..किंवा ज्याला पगार कपात झाल्यामुळे, गृह कर्ज किंवा मुलांच्या शैक्षणिक कर्जाचे हफ्ते भरणे मुश्किल झाले असेल असा,…
अशांना आपण निस्वार्थीपणे मदत करायला हवी व सात्विकतेतील दातृत्व ह्या सद्गुणांची जोपासना केली पाहिजे.
     आपल्याला,  भारतीय सुपुत्र श्री. रतन टाटा व  दुसरे भारतीय सुपुत्र  श्री. अझीम प्रेमजी, ह्यांच्या दानाचे ( डोनेशनचे) गोडवे व्हॉट्स ऍप वर गाण्यात किंवा फेसबुक/ ट्विटर वर “Like”  – कॉमेंट मारून धन्यता मानण्यात, काहीच अर्थ नाही, जोपर्यंत आपण स्वतः गरजवंताला मदत करण्यात खारीचा देखील वाटा उचलु शकत नाही.
    त्यामुळेच म्हणेन, उदारमतवादी – विश्वबंधुत्ववादी – देवदूत बनुया.
      तसेच माझ्या धनवान, व्यावसायिक, कारखानदार, व्यापारी मित्रांना,  हात जोडून कळकळीची विनंती करतो, की त्यांनी कृपया कोणालाही नोकरीवरून काढू नये…कोणाच्याही पगारात कपात करू नये… कित्येक कामगारांवर त्यांच्या एकत्र कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी  एकट्यावरच असते…तो जर बेकार झाला तर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार? तो कर्मचारी कोलमडून पडेल, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होईल……
    आज संपूर्ण जग, फक्त काही काळासाठी थांबले आहे. व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु ह्याचा अर्थ  असा नाही की सर्वकाही संपले आहे. …  फक्त, गेल्या दीड महिन्यात आपल्याला  नफा झाला नाही, एवढाच आर्थिक फरक आपल्या  व्यावसायिक मित्रांच्या जीवनात घडला आहे.
      परंतु जो रोजंदारीवर जगत होता तोच बेरोजगार झाला…. त्याला उदरनिर्वाह/ दैनंदिन गरजा भागवणे मुश्किल झाले आहे. त्याच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याला अस्तित्व आणि रोगापासून बचाव ह्या दोन्ही गोष्टीसाठी प्रचंड धडपड/ संघर्ष करावा लागतोय. त्याला धर्म – जात – प्रांत निरपेक्ष   मदत करणे, हाच आपला धर्म आहे.
    त्यामुळेच पुनः एकदा म्हणेन सात्विक आचारणानुसार , एकमेका सहाय्य करून अवघ्या विश्वाचा कायापालट करूया.
      लॉकडाऊन  मध्ये आज आपण घरात सुरक्षित, सुखरूप व निरोगी आहोत.
      परंतु आपल्या सर्वांसाठी, लॉकडाऊन मध्ये देखील, खडतर परिस्थितीत कामावर उपस्थित राहुन कर्तव्य तत्परता दाखवली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, समाजासाठी जी सेवा दिली आहे त्याला तोड नाही. ते सर्व अनमोलरत्न हीरो आहेत. त्या सर्वांना माझा, मानाचा मुजरा व शुभाशिर्वाद. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
     सर्वप्रथम आपल्या सर्व सफाई कर्मचारी बंधू- भगिनींना माझा शिरसाष्टांग सप्रेम नमस्कार व शुभाशिर्वाद. त्या सर्वांमुळेच माझा परिसर स्वच्छ व निर्जंतुक राहिला. त्यांच्या निस्वार्थी सेवेला कुर्निसात.🙏
    नंतर, आरोग्यसेवा पुरवणारे, सुरक्षा यंत्रणा     पुरवणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, शासकीय यंत्रणेतील कर्मचारी,  अन्नदाता शेतकरी- मित्र, तसेच इतर अगणित ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती ज्यांनी अहोरात्र  मेहनत करून आपणास अविरत सेवा दिली व आपले जीवन सुसह्य आणि सुरक्षित ठेवले, त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद व  शिरसाष्टांग सप्रेम नमस्कार.
सरतेशेवटी, एअर इंडिया (Air India), ह्या भारताच्या नागर विमान वाहतूक कंपनीला मानाचा मुजरा, कारण सर्व जग बंद असताना आपल्या देशवासीयांना परदेशातून मायदेशी परत आणण्यासाठी, भारतात अडकलेल्या      विविध परदेशी नागरिकांना त्यांच्या (आपापल्या) देशात परत नेण्यासाठी,  औषधे, कोविड १९-  पी.पी. ई.-  कीट, टेस्टिंग कीट, जीवनावश्यक वस्तू, ई. ची आवक- नेवाण करण्यासाठी, कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या नागरिकांसाठी जी सेवा दिली आहे, त्याला तोड नाही, ती वंदनीय आहे व देशासाठी अभिमानास्पद आहे. एअर इंडिया  भारतासाठी अशीच निरंतर सेवा देत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
     मित्रांनो, आता निरोपाची वेळ झाली, पुन्हा एकदा परत व्यक्तिशः भेटू लॉकडाऊन संपल्यानंतर  तोपर्यंत….हेच म्हणेन घरातच रहा, स्वच्छतेचे व आरोग्याचे   शिष्टाचार आणि नीतीनियम पाळा, सामाजिक अंतर ठेवा, नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीप्रणाली विकसित करा, ईच्छाशक्ती प्रबळ करा, सकारात्मक विचार सरणी ठेवा, संयम बाळगा, सात्विक रहा, धर्म -जात -प्रांत- निरपेक्ष भावनेने आणि परोपकारीवृत्तीने एकमेकांना सहाय्य करून अवघे विश्व पुन्हा सुदृढ आणि गतिमान करूया.
कळावे लोभ असाच निरंतर वाढावा.
आपला देशप्रेमी- मित्र,
अच्युत तळवडेकर.
Share.

About Author

Maintain by Designwell Infotech