भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचे ऑडिओ ब्रीजद्वारे जिल्हा व मंडल अध्यक्षांना आवाहन
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी व्यापक जनजागृती करावी, तसेच आपल्या विभागातील नागरिकांना सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. श्री. पाटील यांनी आज राज्यातील भाजपच्या सुमारे 743 जिल्हा व मंडल अध्यक्षांशी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला.
श्री. पाटील म्हणाले की, “संपूर्ण जगावर आज कोरोनाचे संकट ओढवले आहे. आपल्या भारत देशातही त्याचा प्रादुर्भाव होत असून, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य सरकारही याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करत आहे. अनेकजण या रोगापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करत आहेत. पण वाढत्या मागणीमुळे या दोन्ही गोष्टींचा बाजारात तुटवडा जाणवत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “ही दोन्ही साधने काही प्रमाणात खर्चिक असल्याने गरीब कुटुंबांना ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाने गरीब कुटुंबांना सॅनिटायजर आणि मास्क रेशनिंग दुकानातून उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही राज्य सरकारकडे करत आहे.
तसेच उत्तर प्रदेश सरकारने हातावर पोट भरणारे, घरकाम करणाऱया महिला, घरगडी, हमाल, भाजीविक्रेते अशा रोजंदारीवर काम करणाऱया लोकांकरिता आर्थिक नियोजन म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे भरण्याचा निर्णय घेतला आहे, तशाप्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, असेही ते शेवटी म्हणाले.