बँक ऑफ महाराष्ट्रचा 86वा स्थापना दिन व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा ग्राहकांसमवेत संपन्न

0

 

बँक ऑफ महाराष्ट्रचा 86वा स्थापना दिन व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा ग्राहकांसमवेत संपन्न

 पुणे: देशात सार्वजनिक क्षेत्रातीय अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्रचा 86वा स्थापनादिन बँकेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये दिनांक 16 सप्टेंबर, 2020 रोजी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा ग्राहकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतभरातील सर्व शाखांचे ग्राहक, ज्यात प्रसिद्ध उद्योगपती, विविध क्षेत्रातील मान्यवर हे या समारंभात व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारा सहभागी झाले. या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री नागेश्वर राव वाय. सीव्हीओ श्री एल. एन. रथ आणि मुख्य कार्यालयातील सर्व सरव्यवस्थापक उपस्थित होते. सध्याच्या साथीच्या संकटाशी सामना करणारे कर्मचारी आणि जनता यांच्याप्रति आदर दर्शविण्यासाठी समारंभ साधेपणाने करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी           श्री ए.एस.राजीव यांनी बँकेचा इतिहास व प्रगति यांचा आढावा घेतला. बँकेच्या संस्थापकांप्रति आदर व्यक्त केला आणि बँकेचे कर्मचारी व ग्राहक यांच्या आधार आणि दर्शवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. सध्याच्या साथीच्या काळात बँकिंग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. डिजिटायजेशन हा बँकिंगचा “मूलमंत्र” झालेला आहे. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की आपण या बदलांशी जुळवून घेतले नाही तर आपण टिकू शकणार नाही. या प्रवासामध्ये आपली अचल निष्ठा तसेच ढिलाई येऊ न देणे याची गरज आहे कारण आपण सर्वजण बदलत्या जगात आहोत.

बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा म्हणाले की आपल्या ग्राहकांच्या अर्थविषयक गरजांसाठी एकमेव पुरवठादार बनण्याचा बँकेचा प्रयत्न आहे जसे वित्तीय सुपर मार्केट. आपल्याला आपल्या मूलभूत सामर्थ्यावर लक्ष केन्द्रित केले पाहिजे. उदा. आपल्या निष्ठावंत ग्राहकांकरवी चालू आणि बचत खात्यांतील ठेवी तसेच किरकोळ , कृषि आणि लघुउद्योग कर्जे यात वाढ करणे, तरुण कर्मचारी वर्ग वाढविणे आणि ग्राहक सेवा अधिक उत्तम करणे.

श्री नागेश्वर राव वाय, कार्यकारी संचालक यांनी असे मत व्यक्त केले की बँकेला मागील सहा तिमाहीमधे सातत्याने नफा झाला आहे आणि त्याचे प्रमाण वाढण्याचा कल दिसून येतो आणि कर्मचारीवर्ग यांचा स्नेह आणि निष्ठा यावरच ही प्रगती आधारित आहे.

या समारंभामधे बँकेच्या क्रेडिट कार्डचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर महाबँक सुवर्णकर्ज पॉईंट, ऑनलाईन/ टॅब बैंकिंग प्रणाली आणि बँकेचे सुधारित संकेत स्थळ  www.bankofmaharashtra.in या सर्वांचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच वसुली विभागाने काढलेले “लीगल एज” त्रैमासिक आणि मानव संसाधन व्यवस्थापन विभागाने काढलेल्या “कल्याणकारी योजना, निवृत्तीपश्चात लाभ व बदलीची मार्गदर्शक तत्वे” या पुस्तिकांचे ही प्रकाशन करण्यात आले.

दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020 या काळात बँक ऑफ महाराष्ट्र “राष्ट्रीय पोषण मास” साजरा करीत आहे. पोषणविषयक गरजा, पोषणातील त्रुटी आणि स्त्रिया व मुले यांच्यामधील कुपोषण याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या सात जिल्हांमध्ये बँकेने शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामधे जागेवर डॉक्टरांची उपलब्धता, पौष्टिक आहाराच्या पाकिटांचे वाटप आणि कोव्हिड 19 साथीच्या संदर्भात सामाजिक अंतर ठेवणे,  स्वच्छता आणि मुखपट्टीचा वापर यांचे महत्व सांगणे यांचा समावेश आहे.

श्री एम. जी. महाबळेश्र्वरकर, सरव्यवस्थापक, संसाधन नियोजन, विपणन व प्रसिद्धी यांनी निमंत्रितांचे स्वागत केले आणि डॉ. एन. मुनीराजू, सरव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

 

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech